तीन नगराध्यक्षांसह ७० नगरसेवक विजयी; दुसऱ्या स्थानावर शिंदेगट शिवसेना
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांची मतमोजणी पार पडल्यानंतर बाहेर आलेल्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) रायगडवासीयांनी पहिली पसंती दिल्याचे चित्र आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या बाजूने कौल दिला असून, चौथ्या स्थानावर उबाठा व पाचव्या स्थानावर शेकाप राहिला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील १० नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ३४, तर २०७ नगरसेवक पदांसाठी ५७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत होते. मतमोजणी रविवारी झाल्यानंतर जिल्ह्यातील १० पैकी मुरुड, रोहा, कर्जत नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) उमेदवार विजयी झाले आहेत, तर खोपोली, महाड, माथेरान नगरपरिषदेत शिवसेना, श्रीवर्धन शिवसेना (उबाठा), अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्ष, उरणमध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), पेणमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे नगराध्यक्ष पदाचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आलेले असले, तरी, २०७ नगरसेवक पदांच्या जागांसाठी सर्वाधिक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ७०, तर शिवसेना ५१ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्या खालोखाल भाजपचे ३५, शिवसेना (उबाठा) २१, शेतकरी कामगार पक्ष २०, काँग्रेस ३, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार २ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तसेच अपक्ष व इतर आघाड्यांचे ५ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले.






