Thursday, December 25, 2025

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’

मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. शहरात अनेक ऐतिहासिक चर्च असून नाताळनिमित्त विविध चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळली आहेत. मुंबईतही असे एक ऐतिहासिक कॅथेड्रल असून त्याचा इतिहास थेट ‘चर्चगेट’ रेल्वे स्थानकाच्या नावाशी जोडलेला आहे. दक्षिण मुंबईतील अनेक ऐतिहासिक इमारतींपैकी असलेल्या या कॅथेड्रलच्या वास्तूत मागील तीन शतकांमध्ये अनेक बदल होत गेले. मात्र आजही ही वास्तू दिमाखात उभी आहे.

मुंबई विविध धर्मियांना, त्यांच्या प्रार्थनास्थळांना आणि येथील समृद्ध संस्कृतीला सोबत घेऊन वाढत गेलेले शहर आहे. आधुनिक मुंबईचे साक्षीदार असलेले यातील एक स्थळ म्हणजे दक्षिण मुंबईतील सेंट थॉमस कॅथेड्रल. नाताळच्या पूर्वसंध्येला या कॅथेड्रलमध्ये कॅरोल गायनाची सुरुवात भारताच्या राष्ट्रगीताने करण्यात आली. कॅथेड्रलच्या भव्य वास्तूत नाताळ साजरा करण्यासाठी जमलेल्या प्रत्येकाने या गायनात सहभाग घेतला. खास वाद्यांच्या साहाय्याने आणि समूह गायनाने सादर झालेले राष्ट्रगीत सध्या समाज माध्यमावर चर्चेचा विषय बनले आहे. सेंट थॉमस कॅथेड्रल हे ब्रिटिश राजवटीत १७१८ साली बांधले गेले. त्याआधी पोर्तुगीज राजवटीत बांधली गेलेली अनेक चर्च शहरात होती. साधारण १८३७ नंतर या चर्चला कॅथेड्रलचा दर्जा देण्यात आला. ब्रिटिश राजवटीतील अनेक अधिकारी, गव्हर्नर, न्यायाधीश, सैनिक यांची स्मारके या कॅथेड्रलमध्ये आहे. स्मारकांची खास ‘इंग्लिश’ पद्धत इथे दिसून येते. दुःख दर्शविणारे उदास पुतळे आणि त्याला साजेशे त्या स्मारकांवर कोरण्यात आलेले संदेश यातून इतिहास उलगडत जातो. १८६२ मध्ये फोर्ट परिसरात बांधलेल्या किल्ल्याच्या तटबंदी पाडण्यात आल्या. त्याआधी मुंबई किल्ल्याला तीन दरवाजे होते. बझार गेट, अपोलो गेट आणि चर्चगेट. रेल्वे स्थानकापासून कॅथेड्रलकडे जाणारा सरळ रस्ता रस्ता आजही आहे, मात्र पूर्वीच्या गेटच्या जागी आता फ्लोरा फाउंटन उभे आहे. या चर्चचे बांधकाम १७१८ साली पूर्ण झाल्यांनतर त्याचवर्षी या चर्चमध्ये पहिल्यांदा नाताळ साजरा करण्यात आला होता. या कॅथेड्रलला २०१८ साली ३०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर विशेष समारंभाचे आजोजन करण्यात आले होते. गेल्या तीन शतकांपासून या वास्तूत नाताळ साजरा करण्यात येत असून यावर्षीही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment