जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ 'मुलगा हवा' या हट्टापायी आपल्या तीन दिवसांच्या चिमुकलीचा जीव घेतला आहे. चौथीही मुलगीच झाल्याचा राग अनावर झाल्याने जन्मदात्या पित्यानेच मुलीच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुलगा हवा होता, पण चौथीही मुलगीचं...
मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय आरोपी कृष्णा लालचंद राठोड याला आधीच तीन मुली होत्या. त्याला चौथ्या वेळी मुलगा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीलाच जन्म दिला. अवघ्या तीन दिवसांच्या या चिमुकलीचा चेहरा पाहून आनंद व्यक्त करण्याऐवजी कृष्णा संतापला. याच रागाच्या भरात त्याने घरातील लाकडी पाट उचलून त्या चिमुकलीच्या डोक्यात घातला. या भीषण हल्ल्यात त्या निष्पाप जीवाचा जागीच अंत झाला.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपने आता पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेतला असून, पक्षाचे फायरब्रँड नेते आणि मंत्री नितेश राणे ...
अपघाताचा बनाव रचला; पण शवविच्छेदन अहवालाने गुपित फोडले
ही हत्या लपवण्यासाठी आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला एक बनाव रचला. "आंघोळ घालत असताना मुलगी अचानक हातातून निसटून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला," अशी खोटी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालाने सर्वांनाच धक्का दिला. मुलीच्या डोक्यावर झालेली जखम ही पडल्यामुळे नसून, कोणत्या तरी जड वस्तूने प्रहार केल्यामुळे झाली असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपी पित्याने दिली गुन्ह्याची कबुली
शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पहूर पोलिसांनी आपला तपासाचा मोर्चा कृष्णा राठोडकडे वळवला. धक्कादायक बाब म्हणजे, पोटच्या गोळ्याची हत्या झाली असूनही कुटुंबातील एकही सदस्य तक्रार द्यायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत कृष्णाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच कृष्णाने आपला गुन्हा कबूल केला. चौथी मुलगी झाल्याच्या वैफल्यातून आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.
कठोर शिक्षेची मागणी
या अमानवीय कृत्यामुळे मोराड गावावर शोककळा पसरली आहे. ज्या पित्याने मुलीचे रक्षण करायला हवे होते, तोच तिचा काळ बनल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपी कृष्णा राठोडला अटक केली असून त्याला कठोरत कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणाऱ्या मानसिकतेने एका चिमुकलीचा बळी घेतल्याने पुन्हा एकदा समाजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.