Friday, December 26, 2025

दंगलीतील आरोपीला प्रवेश देणे हा शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा अपमान

दंगलीतील आरोपीला प्रवेश देणे हा शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा अपमान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जोडे चाटून मते मिळवण्याचे राजकारण महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे नाही

मुंबई : "छत्रपती संभाजी नगरमध्ये दंगली भडकवण्याचा आरोप असलेल्या आरोपीला शिवसेनाप्रमुखांच्या सुपुत्राने आपल्या पक्षात प्रवेश देणे, म्हणजे त्यांच्या कडवट हिंदुत्वाचा अपमान आहे", असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला.

बाल दिवसानिमित्त सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबारमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. रशिद खान मामू यांच्या उबाठामधील प्रवेशाचा धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, हा निर्णय केवळ मतांचे लांगुलचालन करण्यासाठी आहे. अशा प्रकारे व्यक्तीविशेषांना पक्षात सामावून घेणे म्हणजे विचारधारेचा त्याग असून, यातून संबंधित नेतृत्वाची वैचारिक घसरण स्पष्टपणे दिसून येते. विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आणि त्यातून मते मिळवायची, हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसा नाही. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखवली जात आहे. मात्र, अशा राजकारणाला जनता भुलणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशावर प्रेम करणारे, राष्ट्रनिष्ठ आणि विचारांशी प्रामाणिक असलेले नागरिक हे सर्व बारकाईने पाहत आहेत. या प्रकारच्या राजकारणाची किंमत संबंधितांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

महायुतीत कोणताही संभ्रम नाही!

- मुंबई पालिकेत भाजप-शिवसेना एकत्र लढत असल्याची घोषणा कधी होणार, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, महायुतीची घोषणा करण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही. आम्ही आधीपासूनच एकत्र आहोत आणि आमच्यात कोणताही संभ्रम नाही. विरोधकांकडून सोडल्या जाणाऱ्या पुड्या या केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी आहेत. आमच्यातील एकजूट कृतीतून दिसते, घोषणांमधून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. - पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र येणार असतील, तरच त्यांना घोषणा करावी लागते, असा उपरोधिक टोलादेखील त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला लगावला. त्यांनी घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यात नेमके काय सुरू आहे, हेच कुणालाच कळत नाही. पण, महायुती योग्य वेळी योग्य पद्धतीने आपली भूमिका जाहीर करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment