मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स्,आस्थापना, गृहसंकुल व इमारती,समुद्र किनाऱ्यांवर व अन्य ठिकाणी कार्यक्रम,स्वागत सोहळ्यांच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येणार आहे. यासाठी नियमित होणाऱ्या अग्निसुरक्षा तपासणी व्यतिरिक्त मुंबई अग्निशमन दलाकडून ही विशेष मोहिम २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये राबवण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेतंर्गत वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) अर्थात वरळी डोममध्ये मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जी दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये अग्निसुरक्षेचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या डोमला मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वरळी डोममध्ये आग सुरक्षा प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आलेल्या नाही.तसेच प्रवेश मार्गातील अडगळ आणि इतर अग्निशमन सुरक्षा कार्यान्वित नसणे तसेच योग्यप्रमाणात उपलब्ध नसणे असे निदर्शनास दिसून आल्याने वरळी डोमला आग प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली. वरळी डोममध्ये पुढील काही दिवसांमध्ये अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आलेल्या नोटीसच्या अनुषंगाने पुन्हा एकदा तपासणी करून पुढील कडक कारवाई केली जाईल. तसेच नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत तथा वाढीव बांधकाम झाले असल्यास त्यावरही जी दक्षिण विभागाच्या इमारत कारखाना विभागाच्यावतीने कडक कारवाई केली जाईल,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये सध्याच्या विशेष तपासणी मोहिमेंतर्गत अनेक रेस्टॉरंट तसेच पब्ज व मॉल्सची पाहणी करून त्याअंतर्गत अग्निसुरक्षेचे पालन केलेल्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.






