कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या विक्रीची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. इस्लामाबादमध्ये २३ डिसेंबर रोजी झालेल्या एका खुल्या लिलावात प्रसिद्ध उद्योगपती आरिफ हबीब यांनी बाजी मारली असून तब्बल १३५ बिलियन पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ४३०० कोटी रुपयांची बोली लावून या एअरलाइन्सची मालकी मिळवली आहे.
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने आपली सरकारी एअरलाइन्स खासगी हातात सोपवण्याचा निर्णय घेतला होता. या लिलावासाठी आरिफ हबीब यांच्यासह लकी सिमेंट आणि खासगी विमान कंपनी एअरब्लू या तीन प्रमुख कंपन्या रिंगणात होत्या. सुरुवातीला या तिन्ही कंपन्यांनी सीलबंद पाकिटात आपल्या बोली सादर केल्या. जेव्हा हे बॉक्स उघडले गेले, तेव्हा आरिफ हबीब यांची ११५ अब्ज पाकिस्तानी रुपयांची बोली सर्वाधिक ठरल्याने याचा मालकी हक्क हबीब यांना मिळाला.
कोण आहेत आरिफ हबीब? आरिफ हबीब हे पाकिस्तानमधील अत्यंत यशस्वी उद्योजक आणि आरिफ हबीब समूहाचे संस्थापक आहेत. विशेष म्हणजे त्यांचे मूळ धागेदोरे भारताच्या गुजरात राज्याशी जोडलेले आहेत. हबीब यांचे कुटुंब मूळचे गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील बंटवा गावचे रहिवासी होते. मात्र १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब आपली सर्व मालमत्ता आणि गुजरातचा चहाचा व्यवसाय सोडून पाकिस्तानमधील कराचीमध्ये स्थायिक झाले.
आरिफ हबीब यांचा व्यावसायिक प्रवास एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. त्यांनी १९७० मध्ये कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये स्टॉक ब्रोकर म्हणून कामाला सुरुवात केली होती. पुढे आपल्या कष्टाने आणि बुद्धीने त्यांनी स्वतःचे साम्राज्य उभे केले. ते अनेक वेळा कराची स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. आरिफ हबीब समूह आज रिअल इस्टेट, सिमेंट, खत, ऊर्जा, पोलाद आणि वित्तीय सेवा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. एवढ्या व्यावसायात सक्रिय असलेल्या हबीब यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्सच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.
पणजी: गोव्यातील मापुसा न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या पोलिस कोठडीत २९ डिसेंबरपर्यंत वाढ केली ...
एअरलाइन्सवरील निर्बंध आणि दुर्घटनांचा काळा इतिहास २०२० मध्ये कराचीमध्ये पीआयएचे एक विमान कोसळून ९७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने या एअरलाइन्सवर चार वर्षांसाठी बंदी घातली होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच ही बंदी उठवण्यात आल्याने उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे पीआयएची विक्री बंदी उठवल्यानंतर झाल्याने कंपनीचे मूल्य वाढले आणि लिलावाचा मार्ग मोकळा झाला.
व्यावसायिक यशासोबतच आरिफ हबीब हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखले जातात. आरिफ हबीब फाउंडेशनच्या माध्यमातून ते पाकिस्तानमध्ये आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याणाचे प्रकल्प राबवत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पाकिस्तान सरकारने त्यांना 'सितारा-ए-इम्तियाज' या सर्वोच्च नागरी सन्मानाने देखील गौरवले आहे. सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या वेळी त्या विकत घेऊन त्या फायद्यात आणणे हे आरिफ हबीब यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.






