Friday, December 26, 2025

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या लक्षात राहणार आहे. त्यांनी काम केलेल्या ३०० चित्रपटांमधील प्रत्येक भुमिकेतील वैविध्यामुळे त्यांची छाप संपूर्ण जगावर पडली आहे. मात्र प्राणज्योत मावळल्यानंतरही धर्मेंद्र यांचा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही एक अनोखी भेट असणार आहे. कारण हा चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्किस' असे या चित्रपटाचे नाव आहे.

इक्किस हा एक चरित्रात्मक देशभक्तीपर आधारीत चित्रपट आहे. ज्याचे कथानक परमवीर चक्र पुरस्कार विजेते अरुण खेतरपाल यांच्या संघर्षावर आधारीत आहे. या चित्रपटात अरुण खेतरपाल यांची मुख्य भूमिका अगस्त्य नंदा साकारत आहेत. तर धर्मेंद्र अरुण खेतरपाल यांच्या वडिलांची म्हणजे एम. एल. खेतरपाल यांची भूमिका साकरत आहेत. एम. एल. खेतरपालसुद्धा भारतीय सैन्यात सक्रिय होते. त्यामुळे धर्मेंद्र यांची शेवटची भूमिका भारतीय सैन्यातील योद्ध्याची असणार असून हि-मॅनने अखेरच्या क्षणी देशभक्तीपर चित्रपट केल्याने आणि त्यांना पडद्यावर शेवटचे पाहण्यासाठी चाहत्यांची सिनेगृहात गर्दी होऊ शकते असा अंदाज आहे.

इक्कीस या चित्रपटात १९७१ च्या युद्धातील एका योद्ध्याची गोष्ट आहे. तर यानंतर म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणाऱ्या बॉर्डर २ मध्ये सु्द्धा १९७१ च्या युद्धाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. मात्र बॉर्डर २ मध्ये हा विषय एक वेगळा दृष्टीकोनातून मांडला आहे. त्यामुळे एकाच घटनेवर आधारीत दोन वेगवेगळ्या चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment