Friday, December 26, 2025

जव्हारमध्ये बनावट धनादेश प्रकरणातील आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी

जव्हारमध्ये बनावट धनादेश प्रकरणातील आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी

पालघर : सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार कार्यालयातील बनावट धनादेश प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणात शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार येथील धनादेश क्र. ०६९२१८ वर लेखा अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्या बनावट सह्या करून रु. १,११,६३,३१,८१०/- (एकशे अकरा कोटी त्र्येसष्ट लाख एकतीस हजार आठशे दहा रुपये) इतक्या रकमेचा धनादेश ओव्ही कन्स्ट्रक्शनला देण्यासाठी तयार करण्यात आला होता. हा धनादेश आरोपी यज्ञेश दिनकर अंभिरे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा जव्हार येथे सादर केला; परंतु तो वटला गेला नाही. नंतर ओव्ही कन्स्ट्रक्शनचे मालक निलेश रमेश पडवळे यांनी तो धनादेश वटविण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.

सदर प्रकरणाबाबत कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८१/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता १८६० व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी आरोपी निलेश रमेश पडवळे आणि यज्ञेश दिनकर अंभिरे यांना दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करून सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत राहिले आणि नंतर जामिनावर मुक्त झाले होते. मात्र तपास अद्याप अपूर्ण असल्याने आर्थिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पुन्हा पोलीस कोठडीसाठी न्यायालयात दाद मागितली.त्यांची पोलीस कोठडी २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मंजूर केली आहे.

Comments
Add Comment