बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये नेहमीच स्फोटक वातावरण असते. हे दोन्ही देश भारताच्या शेजारीच असल्याने प्रत्येक वेळी भारताला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. ज्यावेळी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळाची परिस्थिती, सत्तापालटाची अराजकता, दंगे होत असतात, त्यावेळी तिथे वास्तव्य करणाऱ्या हिंदूंना नेहमीच ‘लक्ष्य’ केले जाते. बांगलादेशची निर्मिती ही भारताच्या योगदानातूनच झालेली आहे. ‘शेजाऱ्याचे जळके घर आपल्यासाठी नेहमीच धोकादायक असते’, असे म्हटले जाते. भारताला त्याची पावलापावलावर प्रचिती येत आहे. पश्चिम पाकिस्तानने उर्दू भाषेवर आणि पश्चिम पाकिस्तानी संस्कृतीवर जोर दिला, त्यामुळे बंगाली भाषिक पूर्व पाकिस्तानमध्ये असंतोष वाढला. पूर्व पाकिस्तानला राजकीय आणि प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळत नव्हते, तसेच त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. २५ मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये बंगाली ओळख मिटवण्यासाठी क्रूर मोहीम सुरू केली, ज्यामुळे हिंसाचार आणि निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला. भारतीय सैन्याने वेळीच हस्तक्षेप केल्याने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले. भारतामुळे पश्चिम पाकिस्तानच्या अत्याचारातून बंगाली भाषिकांचा प्रभाव असलेल्या पूर्व पाकिस्तानची मुक्तता झाली. भारताच्या उपकाराची जाण न ठेवता बांगलादेशच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी हस्तक्षेप करत भारताला अडचणीत टाकण्याची भूमिका बजावली. काही दिवसांपूर्वीच विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेशची राजधानी ढाकामधल्या अनेक भागांत हिंसाचार उफाळून आला. हादी याची हत्या कोणी केली, हे अद्यापी गुलदस्त्यात असले तरी त्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप तेथील राज्यकर्त्यांनी केला. यामुळे बांगलादेशात भारतविरोधी प्रतिक्रिया उमटल्या. बांगलादेशातल्या मयमनसिंह जिल्ह्यातील भालुका येथे जमावाने दीपचंद दास या हिंदू तरुणाला ठार मारले. धर्माचा अपमान केल्याचा आरोप ठेवत जमावाने मारहाण करून त्याला ठार केले. रात्रीच्या वेळी काही लोकांनी त्याला पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप करत पकडले आणि मारहाण केली. नंतर त्याच्या प्रेताला आग लावली. मुळात या दीपचंद दासने धर्माचा अपमान कधी केला, काय केला आणि त्याला पुरावा काय व जमावाला त्याला ठार मारण्याचा अधिकार कोणी दिला? या प्रश्नांची उत्तरे बांगलादेशमध्ये कोणाकडेही नाहीत व भविष्यातही नसणार. धर्मांध अतिरेकाचा प्रभाव बुद्धिमत्तेवर वाढू लागला, की शरीरातील विवेकाचा अंत होतो. पाकिस्तान व बांगलादेशमध्ये धर्मांधतेचा व भारतविरोधी विषारी मनोवृत्तीचा शिरकाव प्रत्येकाच्या नसानसात भिनला आहे.
फाळणीनंतर अनेक वर्षांनी, पाकिस्तानातील व बांगलादेशमधील हिंदूंची कत्तल केली गेली किंवा त्यांची धर्मांतरही घडवून आणली. परिणामी पाकिस्तानातील त्यांची संख्या जी १९५० मध्ये ८ ते ९% होती, ती आज १० लाखांवर म्हणजे २ ते ३ टक्क्याहून कमी झाली आहे. पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) फाळणीनंतर १९५० मध्ये २५ % हिंदू होते, २०११च्या जनगणनेनुसार बांगलादेशात केवळ ८.६ टक्के हिंदूच शिल्लक उरले. असाच प्रकार सुरू राहिला, तर या देशात हिंदूंची लोकसंख्या हळूहळू शून्याच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही. हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या अत्याचारामुळे गेल्या ३२ वर्षांत बांगलादेशातून ५३ लाखांहून अधिक हिंदूंनी पलायन केले आहे. १९७० मध्ये पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांत शेख मुजीबूर रहमान यांच्या आवामी लीगचा विजय झाला. त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये आणि पूर्व पाकिस्तान फुटून निघू नये म्हणून याह्या खाननी दडपशाही केली. तीस लाखांवर नागरिकांची कत्तल केली आणि एक कोटी निर्वासित भारतात आले. हा इतिहास अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक, पत्रकार गैरी बास यांच्या २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द ब्लड टेलिग्राम निक्सन, किसिंजर अॅण्ड ए फॉरगॉटन जेनोसाईड’ या पुस्तकाने नोंदवला आहे. १९७१ साली हिंदूंच्या नरसंहाराची बाब उजेडात आली असतानाही, भारताने या नरसंहाराचे वर्णन, बांगलादेशींवर झालेले अत्याचार आहेत, अशा शब्दांत केली आणि हिंदू शब्दाचा उल्लेख टाळला. बांगलादेशातील संघटनांच्या माहितीनुसार आजवर ३८ लाख बांगलादेशी हिंदू या नरसंहारात मारले गेले.
बांगलादेश स्वतंत्र करण्यात आणि पूर्व पाकिस्तानची अत्याचारातून मुक्तता करण्यात भारताने पुढाकार घेतला असला, तरी त्याची फार मोठी किंमत भारतालाच मोजावी लागली. ‘देशभक्ती’च्या नावाखाली जेव्हा हिंदूंच्या मालमत्ता लुटल्या जातात, घरे जाळली जातात आणि त्यांना हाकलून दिले, तेव्हा संदेश मिळतो, की बांगलादेशात हिंदूंना स्थान नाही. पाकिस्तानी छळाला भिऊन हिंदू पळून भारतात आले, तेव्हा बंगाली मुस्लिमांच्या एका गटाने त्यांची संपत्ती गिळंकृत केली. त्यामुळे परत आलेले व बळकावलेल्या जमिनी परत मागणारे हिंदू हेच अनेक बांगलादेशी मुस्लिमांच्या हिंदुद्वेषाचे मुख्य कारण झाले. वर्तमान सरकारने हिंदूच्या संपदा परत करण्याकरिता एक कायदा पारीत केला, मात्र ते एक नाटकच ठरले. कारण, बांगलादेशी हिंदूंनी या कायद्याच्या मागे पळण्यातच अधिक पैसा गमावला. साडेसात लाख शेतीवंचित कुटुंबे होती. परिणामी हिंदू कुटुंबांनी गमावलेल्या एकूण जमिनींचा अंदाज १६.४ लाख एकर इतका आहे, जी हिंदू समाजाच्या मालकीतील एकूण जमिनींच्या ५३% आहे. हिंदू हे बांगलादेश लोकसंख्येच्या ८% असले तरी सत्तेमध्ये त्यांचे प्रमाण शून्यच आहे. ते सर्वात मोठे अल्पसंख्याक असले, तरी त्यांचा कोणी प्रवक्ता नाही आणि त्यांची कुठलीही संघटना नाही. याउलट आपल्या देशात बांगलादेशीयांचे लाड सुरूच आहेत. त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड सहजासहजी उपलब्ध होते. त्यांच्या देशात आपल्या बांधवांची हत्या होत असताना, जिवंत जाळले जात असताना आपल्याकडे मात्र बांगलादेशीयांना सर्व सुविधा विनासायास उपलब्ध होत आहेत. हे चित्र बदलण्याची राज्यकर्त्यांची व प्रशासनाची मानसिकता नसल्याने बांगलादेशीयांचा मुजोरपणा वाढला आहे आणि हे घातक आहे.






