मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण
December 25, 2025 06:30 PM
बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. धार्मिक बाबींशी छेडछाड केल्याच्या कृत्यांमुळे जगभरातील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे, या घटनेचा भारताने कठोर शब्दांत विरोध दर्शवला होता. मात्र यावर थायलंडने, "ही मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित केली होती, ते स्थळ धार्मिक कार्यासाठी अधिकृतपणे नोंदणीकृत नव्हते," असे स्पष्टीकरण दिले आहे.
यासंदर्भात स्पष्टिकरण देताना थाई-कंबोडियन बॉर्डर प्रेस सेंटरने म्हटले आहे की, "ही मूर्ती ज्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती, ते ठिकाण धार्मिक कार्यासाठी अधिकृतपणे नोंदणीकृत नव्हते. मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण होते. आपण हिंदू धर्मासह सर्वच धर्माचा आदर करतो. थायलंडच्या मते, ही मूर्ती नंतरच्या काळात स्थापित करण्यात आली होती आणि कंबोडिया या मूर्तीचा वापर वादग्रस्त जमिनीवर आपला दावा सांगण्यासाठी करत होता. जर ही मूर्ती हटवली नसती, तर संवेदनशील सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता होती." यामुळे मूर्ती पाडण्यात आलेच्या सांगितले आहे.
दुसरीकडे या घटनेसंदर्भात बोलताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, "हिंदू आणि बौद्ध देवतांना संपूर्ण प्रदेशात अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजले जाते आणि हा आपल्या सामायिक सभ्यतेचा वारसा आहे. प्रादेशिक वादांमुळे, जेव्हा अशी कृत्यं होतात, तेव्हा श्रद्धाळूच्या भावना दुखावल्या जातात." दरम्यान, दोन्ही देशांनी हा सीमावाद संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवायला हवा, असे आवाहनही यावेळी जायसवाल यांनी केले.
दरम्यान कंबोडियानेही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रीह विहार प्रांताचे प्रवक्ते किम चानपनहा यांनी दावा केला की, ही मूर्ती २०१४ मध्ये थायलंडच्या सीमेपासून १०० मीटर दूर कंबोडियाच्या हद्दीत उभारण्यात आली होती, जी थायलंडने बेकायदेशीरपणे पाडली आहे.