ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात एक अनोखी गोष्ट घडली आहे. बांगलादेशचे माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान तब्बल १७ वर्ष लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहिल्यानंतर मायदेशी परतले आहेत. ढाका विमानतळावर बांगलादेश नॅशनल पार्टीच्या हजारो समर्थकांनी हातात बॅनर घेऊन तारिक रहमान आणि त्यांच्या कुटुंबाचे जंगी स्वागत केले. त्यामुळे अचानक १७ वर्षांनंतर तारिक रहमान स्वगृही का आले? हा प्रश्न राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो.
तारिक रहमान यांच्या बांगलादेशात घरवापसीनिमीत्त बीएनपी समर्थक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बनानी एअरपोर्ट रोडवरून ढाका विमानतळाच्या दिशेने पायी रॅली देखील काढली. त्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने समर्थक रस्त्यांवर उतरल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी तारिक रहमान हे पत्नी झुबेदा रहमान आणि मुलगी झेमा रहमान यांच्याबरोबर लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून ढाकाकडे रवाना होतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ढाक्यात तारिक रेहमान यांच्या उपस्थित महारॅली घेण्यासाठी बीएनपी तयारी सुरू केली होती.
रहमान हे स्वतःहून निर्वासित म्हणून २००८ ते २०२५ च्या अखेरपर्यंत लंडन येथे राहिले आहेत. त्यांनी सप्टेंबर २००८ मध्ये बांगलादेश सोडला होता. यानंतर डिसेंबर २००९ मध्ये ढाका येथे आयोजित केलेल्या बीएनपीच्या ५ व्या राष्ट्रीय परिषदेत त्यांची पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, मात्र तेव्हापासून त्यांनी परदेशातूनच पक्षाचे नेतृत्व केले. यूकेमधील कंपनीज हाऊसमध्ये सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, सुरुवातीला त्यांनी आपले राष्ट्रीयत्व 'ब्रिटीश' असे नमूद केले होते. मात्र, २०१६ मध्ये त्यांनी या कागदपत्रांत सुधारणा केली आणि आपले राष्ट्रीयत्व 'बांगलादेशी' असल्याचे जाहीर केले. तर २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर तारिक यांच्यावरील खटले रद्द करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी बांगलादेशमध्ये परत येणार असल्याचे जाहीर केले होते.
नवी दिल्ली : नाताळच्या दिवशी २४ कॅरेटच्या एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा दर एक लाख ३९ हजार २५० रुपये तर २२ कॅरेटच्या एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा दर एक लाख ...
तारिक रहमान कोण आहेत?
तारिक रहमान हे बांगलादेश नॅशनल पार्टीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान झिया खलिदा यांचे पुत्र आहेत. तारिक रहमान यांना बांगलादेशच्या राजकारणात क्राऊन प्रिन्स असे म्हटले जाते. बांगलादेशचे संस्थापक आणि लष्कराचे प्रमुख तसेच माजी राष्ट्रपती जियाउर रहमान यांचे ते सर्वात लहान पुत्र आहेत. त्यांची आई खलिदा झिया या तीनदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या होत्या. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला तारिक बीएनपीमध्ये एक महत्त्वाचा चेहरा म्हणून उदयास आले. यानंतर खलिदा झियांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडेच पाहिले जाऊ लागले. कारण युवक वर्गात त्यांची लोकप्रियता वाढली होती.






