पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आहे. या वाघिणीचा मुक्त संचार सकाळी मांगडेवाडी परिसरात दिसून आला.
मांगडेवाडी ते जिंती दरम्यान सकाळी सातच्या सुमारास तारा वाघिणीचा मुक्त संचार सुरू होता. राज्य परिवहनची बस मांगडेवाडी ते जिंती दरम्यानच्या रस्त्यावरुन जात असताना चालक संदीप जाधव यांनी रस्त्याजवळ वाघीण बघितली. चतुराईने चालक संदीप जाधव यांनी बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना शांत राहण्यास बजावले. प्रवाशांनी शांत राहून आपापल्या मोबाईलमध्ये तारा वाघिणीचे फोटो, व्हिडीओ काढून घेतले.
तारा वाघिणीच्या गळ्यात रेडिओ कॉलर आयडी दिसला. यामुळे ही ताडोबा अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित तारा वाघीण असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. वन विभागाने काही दिवसांपूर्वीच ताडोबा अभयारण्यातून तारा वाघिणीला चांदोलीच्या जंगलात सोडले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा यशस्वी झाल्याचे वन विभागाने सांगितले.
ताराच्या हालचालींवर वनविभाग सातत्याने नजर ठेवून आहे. चांदोली परिसरात मुक्त संचार करतानाचे अनेक व्हिडिओ याआधीही समोर आले आहेत. मात्र आज सकाळी पाटण तालुक्यातील मांगडेवाडी परिसरातच तारा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर वन्यजीव आणि निसर्गप्रेमींमध्ये मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
‘तारा वाघिणीने चांदोलीमध्ये उत्कृष्ट क्षमता दाखवली आहे. ती जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी पूर्णपणे सिद्ध आहे,’असं वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावं आणि वाघीण दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.






