Thursday, December 25, 2025

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक

नितीन सावंतांना सोबत घेऊन थोरवे आणि लाड यांना धक्का

कर्जत : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या (राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा) उमेदवार पुष्पा दगडे यांनी महायुतीच्या उमेदवार स्वाती लाड यांचा पराभव केला. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आणि भाजपचे नेते माजी आमदार सुरेश लाड यांच्यासाठी हा मोठा धक्का असून सुधाकर घारे यांचे हे 'कमबॅक' मानले जाते. कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत अटीतटीचा सामना झाला. थोरवे आणि लाड यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. राज्यात शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी महायुतीत सोबत असले, तरी जिल्ह्यात आणि कर्जत- खालापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतून विस्तव जात नाही. थोरवे यांनी राष्ट्रवादीसोबत युती नाही, हे निवडणुकीआधीच जाहीर केले होते. निवडणुकीदरम्यान एकत्र येऊन थोरवे आणि लाड यांनी लाड यांच्या सूनबाई स्वाती लाड यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवार केले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे घारे आणि उबाठाचे सावंत यांनी एकत्र येऊन 'परिवर्तन विकास आघाडी' स्थापन केली आणि राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले. ही निवडणुक त्यामुळे प्रतिष्ठेची झाली. परंतू,घारे यांनी प्रभाग निहाय नियोजन करत थोरवे - लाड यांना कर्जतमध्ये थोपवून विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला. सावंत यांच्यासोबत आघाडी करून कर्जतच्या राजकारणात त्यांनी मोठा बदल घडवून आणल्याचे बोलले जाते.

विकासाच्या मुद्द्यावर भर ! विधानसभा निवडणुकीपासूनच घारे यांनी कर्जतमधील गुंडगिरी आणि रखडलेल्या विकासाच्या मुद्दयावर भर देत पारदर्शक, लोकाभिमुख कारभार आणि सर्वांगीण विकास हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले होते. विधानसभेला लाड यांनी शेवटच्या क्षणी थोरवे यांना पाठींबा दिला होता. त्यावेळी घारे यांचा निसटता पराभव झाला. मात्र कर्जतच्या प्रश्नांवर कायम राहत नगरपरिषदेच्या निवडणुकीतदेखील घारे यांनी याच मुद्द्यांवर भर ठेवला.
Comments
Add Comment