Thursday, December 25, 2025

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ करायचं आणि आपल्या आधीच त्याचं जाणही आपणच बघायचं. हा दुर्दैवी प्रवास महाराष्ट्रातील एका वृक्ष संवर्धकासोबत घडला आहे. मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील वृक्ष संवर्धनाच्या लढ्यासाठी सयाजी शिंदे यांचे नाव जोडले जाते. सयाजी शिंदेंच्या पर्यावरण संवर्धनाचा महाराष्ट्रातील एक वस्तुपाठ मानल्या जाणाऱ्या बीड तालुक्यातील पालवन परिसरातील ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला २४ डिसेंबरच्या संध्याकाळी भीषण आग लागली.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

‘सह्याद्री देवराई ’ला लागलेल्या आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केल्यामुळे देवराई प्रकल्पातील डोंगरावर असणारी हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर क्षणार्धात पाणी फेरलं गेलंय. कारण सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराला हिरवेगार करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यातही पाण्याचे टँकर लावून इथल्या झाडांनाही हायड्रेट ठेवण्यात येत होते. मात्र हे सगळं एका आगीमुळे डोळ्यासमोर पुन्हा ओसाड झाल्यासारखे झाले आहे.

या घटनेबाबत एक दुसरी बाजू समोर येत आहे ते म्हणजे संबंधित आग देवराईला लागली नसून जवळच असणाऱ्या पिंपळवंडी भागात लागली होती. या ठिकाणी अनेकजण पार्ट्या करायला येतात. तसेच थंडीचे दिवस असल्यामुळे शेकोटी करतात. त्यामुळे सिगरेट्स आणि इतर ज्वलनशील पदार्थांबद्दल तरूणांनी दाखवलेला निष्काळजीपणा भोवल्याचे दिसून येत आहे. तर महत्त्वाचे म्हणजे रानातील पालापाचोळा, गवत सुकल्यामुळे आणि संध्याकाळच्या वेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग वेगाने पसरण्यास वेळ लागला नाही. आता आग नेमकी कुठे लागली हा मुद्दा जरी महत्त्वाचा असला तरी शेकडो वृक्षांचे जीवन संपले आहे, ही गोष्ट हृदयद्रावक आहे.

Comments
Add Comment