Thursday, December 25, 2025

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं 'मॅजिक' काय आहे, असा प्रश्न या गुंतवून ठेवणाऱ्या ट्रेलरनं निर्माण केला आहे. नुकताच सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सायकोलॉजिकल पद्धतीनं गोष्ट उलगडणारा 'मॅजिक' हा चित्रपट नव्या वर्षात, १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुतरी व्हेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी मॅजिक या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'आई कुठे काय करते'सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांची छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या प्रमुख भूमिकेत असून, सिद्धीरूपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रूपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये गौरवला गेला आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने केलेला एन्काउंटर आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथींची गोष्ट "मॅजिक" या चित्रपटात आहे. एन्काऊंटर केल्यानंतर हा पोलीस अधिकारी गावी येतो, पण एक मुलगी तिथं पोहोचते आणि मग सुरू होतो एक वेगळा खेळ... हे नेमकं प्रकरण काय आहे, एन्काऊंटर आणि अत्तर यांचा काय संबंध असतो, ती मुलगी नेमकी कोण असते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच मिळणार आहेत. प्रचंड गुंतागुंत, सायकोलॉजिकल गोष्ट, उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक आणि महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेला 'मॅजिक' हा चित्रपट १ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Comments
Add Comment