Thursday, December 25, 2025

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर वशिला लावत आपल्या पदरी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या इच्छुकांच्या रांगेत काही पक्षांचे आमदार आणि माजी आमदार व खासदार हे आपल्या मुलांचे तसेच नातेवाईकांची वर्णी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये उबाठा शिवसेनेचे सुनील प्रभू, अजय चौधरी, माजी आमदार दगडू सकपाळ, भाजपाचे आमदार मनिषा चौधरी, शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर, आमदार अशोक पाटील आदी लोकप्रतिनिधी आपल्या मुलांची आणि नातेवाईकांना या माध्यमातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची यादीही निश्चित करण्यात आली आहे. परंतु कोणत्याही प्रकारे पक्षामध्ये बंडखोरी होवू नये यासाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. मात्र, यामध्ये काही पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या उमेदवारांना महापालिकेच्या माध्यमातून संसदीय राजकारणाच्या अभ्यासाची पहिली पायरी चढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी आमदार अमित साटम यांचे मेव्हणे रोहन राठोड, आमदार भारती लव्हेकर यांचे नातेवाईक योगीराज दाभाडकर, विद्या ठाकूर यांचे पुत्र दिपक ठाकूर, पराग अळवणी यांची पत्नी ज्योती अळवणी, खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे, आमदार नवाब मलिक यांची बहिण डॉ सईदा खान, भाऊ कप्तान मलिक, माजी आमदार सुरेश गंभीर यांची कन्या शितल, माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र आकाश, आमदार राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील आदी आमदार आणि माजी आमदार यांचे नातेवाईक हे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत

मात्र, आता आगामी निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे सुनील प्रभू यांचे पुत्रे अंकित, आमदार अजय चौधरी यांची सून गौरी, माजी आमदार दगडू सकपाळ यांची कन्या रेश्मा, शिवसेना आमदार अशोक पाटील यांचे पुत्र रुपेश, खासदार रविंद्र वायकर यांची कन्या दिप्ती तसेच माजी खासदार मनोज कोटक यांचे बंधू केतन आदी लोकप्रतिनिधी हे आपल्या नातेवाईकांना निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहेत. परंतु बऱ्याचे ठिकाणी आरक्षणाचा फटका बसल्याने यांचे पुनर्वसन करण्यासाठी आसपासच्या प्रभागांमध्ये शोधाशोध तसेच चाचपणी करून वर्णी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  1. आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित( इच्छुक प्रभाग ५१)
  2. आमदार अजय चौधरी यांची सून गौरी( इच्छुक प्रभाग २०३, प्रभाग २०५)
  3. माजी आमदार दगडू सकपाळ यांची कन्या रेश्मा(इच्छुक प्रभाग २०३)
  4. आमदार अशोक पाटील यांचे पुत्र रुपेश (इच्छुक प्रभाग ११३)
  5. आमदार मनिषा चौधरी यांची कन्या अंकिता (इच्छुक प्रभाग ०८)
  6. खासदार रविंद्र वायकर यांची कन्या दिप्ती ( इच्छुक प्रभाग ७४)
  7. खासदार संजय पाटील यांची कन्या राजुल(इच्छुक प्रभाग ११५)
  8. माजी खासदार मनोज कोटक यांचे बंधू केतन( इच्छुक प्रभाग १०७)
Comments
Add Comment