डॉ. अनुराधा कुलकर्णी, भारतीय ऋषी
…anuradh.klkrn@gmil.com
फार पूर्वी सर्व वेदमंत्र एकत्रच होते. त्या सहस्त्रावधी मंत्रात काहीत इंद्र, अग्नी, मरुतगण इ. देवतांना केलेल्या छंदबद्ध प्रार्थना होत्या, काहीत परमतत्त्वांचे विवेचन होते. काही गद्य मंत्रांमध्ये निरनिराळ्या यज्ञयागांची सविस्तर माहिती होती. तर काहींमध्ये वैद्यकशास्त्र, शत्रूनाश, युद्धशास्त्र, राष्ट्रधर्म, समाजव्यवस्था इ.चे खच्चून भरलेले भांडार होते, काही पद्यमंत्रांच्या स्वरांची विस्तृत जाणकारी असलेले मंत्रही होते. वेदाध्ययनासाठी या हजारो मंत्रांचे विषयानुरूप नीट वर्गीकरण होणे आवश्यक होते. ते वेदवर्गीकरणाचे दैवी कार्य महर्षी व्यासांनी केले. वेदमंत्रांचे वर्गीकरण करून त्यातील भागांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद अशी विषयानुरूप नावे दिलीत. या समग्र वेदसंपदेची व्यवस्थित जोपासना व्हावी म्हणून आपल्या पैलमुनी, वैशंपायनमुनी, जैमिनीमुनी व सुमन्तुमुनी या चार विद्वान शिष्यांवर हे चार भाग महर्षी व्यासांनी सोपविले. या शिष्यांनी आपल्यावर सोपविलेल्या वेदाचे आपापल्या शिष्यवर्गाकडून अध्ययन, पठण करून घेतले. वेदाभ्यास पूर्ण झाल्यावर त्या शिष्यांनी स्वतःच्या शिष्यांकडून वेदाध्ययन करवून घेतले. अशारीतीने या चारी वेदांच्या अभ्यासकांची शिष्यपरंपरा निर्माण झाली. ती आजतागायत चालू आहे. महर्षी व्यासांच्या या चार महान शिष्यांपैकी जैमिनीमुनींच्या कार्याचा आपण मागोवा घेऊ या.
जैमिनीमुनींची संगीताबद्दलची गाढ आस्था व सुरांचे सखोल ज्ञान लक्षात घेऊन वेदव्यासांनी त्यांच्याकडून सामवेदाचे सूक्ष्म अध्ययन करवून घेतले आणि या वेदाचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोपविली. ज्ञानाने ईश्वरी साक्षात्कार होईल पण उत्कट भावाशिवाय ईश्वराशी एकरूपता होणार नाही. उत्कट भाव स्वरात परावर्तित होतात. ऋग्वेदात म्हटले आहे की...
स्वरन्ति त्वा सुते नरो वसो निरेके उक्थिनः । ऋ.मं८सू३३.२
“हे शिष्या, तू आपल्या आत्मिक उत्थानासाठी माझ्याकडे आला आहेस, मी तुला परमेश्वराचा उपदेश सांगतो. त्याला प्राप्त करण्यासाठी तू त्याला संगीतमय साद घालशील तर तो तुझ्या हृदयाच्या गुहेत प्रकट होऊन आपले प्रेम तुला प्रदान करेल.”
रसो वै सः असे परमात्म्याचे वर्णन आहे. हा रस संगीतात प्रकर्षाने प्रकट होतो. म्हणूनच भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंतांनी आपल्या विभूती सांगताना “वेदानाम् सामवेदोSस्मि’’(१०,२२) म्हणजे चारी वेदातील सामवेदात मी प्रकर्षाने आहे, असे म्हटले आहे. शिवाय “बृहत्साम तथा साम्नां’’(१०,३५) म्हणजे सामवेदातील मंत्रगीतांमधल्या बृहत्साम नामक गीतप्रकारात मी विशेषत्वाने आहे, असेही भगवंत म्हणतात. असा हा भगवंतप्रिय सामवेदाचा अत्युत्कट प्रकार जैमिनीमुनींनी पूर्ण ताकदीने सांभाळला, एवढेच नव्हे तर तो सर्वांगपरिपूर्णतेने संवर्धित केला. गुरुआज्ञेप्रमाणे जैमिनीमुनींनी आपल्या अनेक शिष्यांना सामवेदाचे ज्ञान दिले. त्या शिष्यात जैमिनींचे पुत्र सुमन्तू व पौत्र सुकर्मा हेही होते. सुकर्मा यांनी सामवेदसंहितेचे एक हजार शाखाभेद करून त्या वेदाचा खूप विस्तार केला, म्हणजे गायनाचे हजार प्रकार प्रस्थापित केले. मात्र सांप्रत सामवेदाच्या कौथुम, राणावत व जैमिनीय या तीन शाखाच उपलब्ध आहेत. सामवेदात ऋचांचे गायन कसे करावे, याचे विवेचन आहे. मंत्राचे गद्य, पद्य व गायन असे तीन प्रकार असतात. यजुर्वेदातले मंत्र हे गद्य प्रकारात मोडतात, तर ऋग्वेदातील सर्व ऋचा या छंदोबद्ध म्हणजे पद्य आहेत. पण त्यातील काही ऋचा या सामगानाला अधिक अनुकूल असल्याने त्यांचा समावेश सामगायनात केलेला आहे. ज्या ऋचेवर गानप्रकार गायचा असतो, त्या ऋचेला योनी असे म्हणतात. एकाच योनीवर अनेक सामे गाता येतात व एकच गानप्रकार कोणत्याही ऋचेवर म्हणता येतो. जैमिनीय शाखेत ३६८१ गानप्रकार सांगितले आहेत!
सामवेदाचार्य जैमिनीमुनींनी सामगायनाप्रमाणेच वैदिक कर्मांचे माहात्म्य स्थापन करणारी षड्दर्शनातील पूर्वमीमांसा या दर्शनाची सूत्रेही लिहिली आहेत. मीमांसेची सूत्रमय लेखनप्रवृत्ती सामवेदापेक्षा खूपच वेगळी असूनही जैमिनीऋषींसारखे चतुरस्र प्रज्ञेचे महात्मे सर्व ज्ञानक्षेत्रात तळपतात. जैमिनी ऋषींनी पूर्वमीमांसा सूत्रे ही मुख्यतः गृहस्थाश्रमींसाठी लिहिली आहेत,
वेदोक्त कर्मे हाच पूर्वमीमांसेचा विषय आहे. त्यात यज्ञादिक कर्मकांडांचा अधिक विचार आहे.
गृहस्थांनी पुढील यज्ञ नित्य करावयाची असतात – १) स्वाध्यायरूपी ब्रह्मयज्ञ २) सकाळ-संध्याकाळ सत्कार्यशक्तिरूप देवतास्मरणरूपी देवयज्ञ ३) वाडवडिलांची श्रद्धायुक्त सेवारूपी पितृयज्ञ ४) भूतदयारूपी बलिवैश्वदेवयज्ञ ५) गरजूंना साह्य, समाजसेवा, अतिथीसत्काररूपी मनुष्ययज्ञ. यज्ञामागच्या या संकल्पना लक्षात घेतल्या तर ज्याचा सर्वांना आधार असतो, त्या गृहस्थाश्रमात करावयाचे यज्ञकर्तव्य सदैव चालू राहिले पाहिजे, हे आपल्याला पटते. म्हणूनच भारताच्याच नव्हे तर जगाच्या दार्शनिक साहित्यात जैमिनीमुनींच्या पूर्वमीमांसेचे स्थान महत्त्वाचे आहे.






