मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
राज्यात उत्पादित झालेल्या डाळिंबाचे तीन कंटेनर वाशी येथील सुविधा केंद्रातून के.बी. एक्सपोर्ट्सचे चेअरमन प्रकाश खाखर यांनी नुकतेच ब्रिस्बेन- ऑस्ट्रेलिया, न्यूयॉर्क- अमेरिका, लॉस एंजेलिस- अमेरिका येथे निर्यात केले. या पार्श्वभूमीवर पणन मंत्री रावल यांनी प्रकाश खाखर यांचे अभिनंदन केले. त्यावेळी ते बोलत होते.
जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी सातत्याने वाढत आहे. राज्यात उत्पादित होणारा डाळिंब हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासह अन्य देशात निर्यात होत आहे. टप्प्याटप्प्याने इतर फळांची निर्यात करण्यासाठी पणन विभाग प्रयत्न करत आहे. यामुळे फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक मूल्य मिळेल. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासह अन्य देशांमध्ये कंटेनर रवाना होणे हे राज्याच्या कृषी-निर्यात व शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येणाऱ्या काळात निर्यात सुविधा केंद्रातून मोठ्या क्षमतेने डाळिंब निर्यात केले जाणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.






