‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम
कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ सिलोन’ने १०० वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे. सिनेरसिकांना गेली अनेक दशके रिझवणाऱ्या नभोवाणीच्या या केंद्राची शताब्दी ही इतिहासातील एक महत्त्वाची घटना असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘बिनाका गीतमाला’सारखे अनेक संस्मरणीय कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या ‘रेडिओ सिलोन’चे चाहते जगभर पसरले असून, रसिकांमध्ये आजच्या इंटरनेटच्या काळातही नभोवाणीच्या या केंद्राची चर्चा रंगते.
श्रीलंकेतील रेडिओ सेवा अर्थात ‘रेडिओ सिलोन’ अधिकृतपणे १६ डिसेंबर १९२५ रोजी सुरू झाले. सरकारी नोंदीनुसार हे आशियातील पहिले व्यावसायिक ‘शॉर्ट वेव्ह’ केंद्र होते. या रेडिओ केंद्राकडे आशियातील सर्वांत मोठे गाण्यांचे ग्रंथालय आहे. भारतातही कोणाकडेही उपलब्ध नसलेली अनेक दुर्मीळ हिंदी गाणी आणि जगातील नेत्यांच्या आवाजाच्या रेकॉर्डस केंद्राकडे उपलब्ध आहेत. मुळात दूरसंचार विभागाचा भाग असलेली ही सेवा १ ऑक्टोबर १९४८ रोजी ‘रेडिओ सिलोन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर ५ जानेवारी १९६७ रोजी ‘श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ असे तिचे नामकरण झाले.
‘रेडिओ सिलोन’वर अनेक दशके दर आठवड्याला रात्री आठ वाजता अमीन सायानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रम प्रसारित होत होता. सयानींच्या ‘भाईयों और बहनो’ हे शब्द हिंदी चित्रपट संगीतप्रेमी मनात साठवत असत. दर आठवड्याला कोणती गाणी वाजणार याची उत्सुकता लागून राहत असे. ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम रेडिओ सिलोनवर १९५२ ते १९८८ दरम्यान प्रसारित झाला; नंतर सहा नोव्हेंबर १९८९ मध्ये ते ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या विविध भारती सेवेत दाखल झाला आणि १९९४ पर्यंत सुरू होता.
‘‘रेडिओ सिलोन ही दंतकथा आहे, अनेक पिढ्या त्यासोबत वाढल्या,’’ असे ज्येष्ठ रेडिओ सूत्रसंचालक अरुण दायस बंडारनायके यांनी केंद्राच्या शताब्दीनिमित्त सांगितले. मात्र, त्यांनी राजकीय हस्तक्षेपामुळे घेतलेल्या काटकसरीच्या निर्णयांवर टीका केली. ‘ऑल एशिया इंग्लिश’ शॉर्टवेव्ह सेवा ९० च्या दशकात बंद केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
रेडिओ सिलोनच्या संग्रहात ७० हजारांपेक्षा जास्त रेकॉर्डस् आहेत. संग्रहात ७८ आरपीएमच्या जुन्या रेकॉर्ड्सपासून, पॉप संगीताच्या एलपी रेकॉर्ड्सचाही समावेश आहे.विविध युद्धे, भारताचा स्वातंत्र्यलढा, एव्हरेस्टची पहिली चढाई, चंद्रावर मानवाने ठेवलेले पाऊल अशा अनेक प्रसंगात रेडिओ सिलोनने विशेष कार्यक्रमांचे प्रसारण केले.