Thursday, December 25, 2025

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती झाल्यामुळे मनसेला किती जागा सोडल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, शिवसेनेला टक्कर देण्यासाठी पुन्हा सज्ज होत उबाठाने आपला जम बसवण्यासाठी २२७ प्रभागांमध्ये पुन्हा कामाला सुरुवात केली. मात्र, युतीमध्ये उबाठा १३५ मनसे ८० आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यास त्यांना १० ते १२ जागा सोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीत काही जागांवर उबाठाच्या शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह अनेकांना आपल्या काही जागांवर पाणी सोडाव्या लागणार आहे. त्यामुळे आता उबाठामध्ये मनसेच्या दुसऱ्या भिडूमुळे तीव्र नाराजी पसरली आहे. याचा परिणाम येत्या काही दिवसांमध्ये बंडखोरीच्या माध्यमातून दिसण्याची शक्यता आहे. आम्ही मेहनत करून वॉर्ड बांधलेत आणि आता या संपलेल्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही निवडून द्यायचे का अशा प्रकारच्या तीव्र भावना विभागाविभागांमधून ऐकायला येत आहे.

उबाठा शिवसेना आणि मनसेची युती झाल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी जागा वाटपांचा आकडा जाहीर केलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये किती जागा आणि कुठल्या जागांवर अंतिम शिक्कामोर्तब झाला आहे याची माहिती त्यांनी दिलेली नाही. मात्र,सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २२७ पैंकी उबाठा १३५ आणि मनसे ८० जागांवर निवडणूक लढवेल अशाप्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ८० जागांवर मनसेचे उमेदवार निश्चित झाल्यास उबाठाला शिवसेनेत निष्ठेने राहत पक्ष संघटना वाढवण्यासाठी ज्यांनी अथक मेहनत केली आहे, त्या उबाठा शिवसैनिकांवर अन्याय होणार आहे. या अन्यायाचे पडसाद दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे

उबाठाच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार, मनसेसोबत युती झाली याचे समाधान असले तरी ही युती लोकसभेपासूनच जर झाली असती आज महापालिकेवरील ठाकरे बंधूच्या युतीचा झेंडा निश्चितच पहायला मिळाला असता. आता आम्ही निष्ठेने काम करून संघटना वाढवली, प्रसंगी शिंदे शिवसेनेला अंगावरही घेतले आणि आता आयत्यावर कोयता मारावा त्याप्रमाणे मनसेला जर जागा सोडल्या जात असतील तर निश्चितच निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर तो अन्याय करणारा ठरणार आहे.

आज मनसेचे अस्तित्व काय? यापेक्षा काँग्रेससोबत आघाडीत राहिलो असतो तरी किमान निवडून येण्याची शाश्वती तरी होती, काँग्रेसमुळे आमच्या काही जागाही वाढल्या असत्या, पण संपलेल्या मनसेमुळे उबाठाच्या जागा वाढणार नसून मनसेचाच आकडा वाढला जाईल. त्यामुळे मनसेला देवू केलेल्या जागा किंवा भविष्यात जागा दिल्यास तिथे निश्चितच बंडखोरी होईल अशी भीती उबाठाच्या पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment