Thursday, December 25, 2025

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कॅनडामध्ये घडली आहे. कॅनडातील एका ४४ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीचा रुग्णालयात तब्बल आठ तासांहून अधिक काळ उपचारांसाठी वाट पाहिल्यानंतर मृत्यू झाला आहे. प्रशांत श्रीकुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रशांत यांना २२ डिसेंबर रोजी कामावर असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्यांना एडमोंटन येथील ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र रुग्णालय प्रशासनाने उपचारांमध्ये दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकुमार यांनी त्यांच्या कार्यालयात छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांना एडमोंटन येथील ग्रे नन्स रुग्णालयात नेले. तिथे त्यांचे प्राथमिक उपचार सुरू झाले पण नंतर वेटिंग रूममध्ये बसवण्यात आले. यानंतर काही वेळातच रुग्णाचे वडील देखील तात्काळ रुग्णालयात पोहोचले. यावेळी रुग्णाने आपल्या वडिलांकडे 'बाबा, मी हे दुखणे सहन करू शकत नाही,' अशी आर्त साद घातली. यामुळे श्रीकुमार यांच्या वडिलांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले.

वेदनेची माहिती दिल्यानंतर, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी श्रीकुमार यांच्या हृदयाची स्थिती तपासण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) केला. त्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले की, काही विशेष अडचण नसून थोडा वेळ वाट पाहावी. त्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी श्रीकुमार यांना वेदना कमी करण्यासाठी टायलेनॉलच्या काही गोळ्या दिल्या. मात्र त्यांचा रक्तदाब वाढतच होता.

श्रीकुमार यांच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, "दुखणे वाढतच गेले. आठ तासांहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर अखेर त्याला उपचारांसाठी बोलावण्यात आले. जवळपास १० सेकंदांचा वेळ गेल्यानंतर त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो उठून आपल्या छातीवर हात ठेवताच अचानक खाली कोसळला. यानंतर मी नर्सला मदतीसाठी बोलावले आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप उशीर झाला होता." रुग्णालयाने दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे अखेर प्रशांत श्रीकुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि तीन मुले आहेत, ज्यांचे वय तीन, दहा आणि चौदा वर्षे आहे.

दरम्यान, ग्रे नन्स रुग्णालयाने या घटनेबाबत दिलेल्या एका निवेदनात, रुग्णाच्या काळजीशी संबंधित तपशीलांवर भाष्य करण्यास नकार दिल्याचे दिसले. तर आम्ही रुग्णाच्या कुटुंबियांप्रति आणि मित्रांप्रति आमच्या संवेदना व्यक्त करतो. आमच्या रुग्णांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि काळजी यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही, असे सांगितले. मात्र वास्तविक पाहता श्रीकुमार यांच्या प्रकरणानंतर रुग्णालयात रुग्णांची काळजी घेत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment