Wednesday, December 24, 2025

Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

Ashish Shelar :

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव वेगाने सुरू झाली असून, (उबाठा) गट आणि (मनसे) या दोन भावांच्या पक्षांमध्ये वाढणारी जवळीक सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष आणि विसंवाद बाजूला सारून हे दोन्ही पक्ष युती करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. या संभाव्य युतीवर भाजपने आता टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर एक बोचरी कविता पोस्ट करून या नव्या मैत्रीवर जोरदार प्रहार केला आहे.

शेलार यांनी आपल्या कवितेतून राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना केलेल्या 'बडवे आणि कारकून' या आरोपांची खोचक आठवण करून दिली. राज ठाकरेंनी ज्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर टीका करत स्वतःचा वेगळा रस्ता निवडला, आज केवळ सत्तेच्या मोहापायी ते त्याच लोकांशी 'गळ्यात गळे' कसे घालू शकतात, असा थेट सवाल शेलार यांनी सवाल विचारला आहे. ही युती म्हणजे मुंबईच्या विकासासाठी नसून, पालिकेची तिजोरी लुटण्यासाठी रचलेला हा एक बनाव आहे, असा गंभीर आरोप करत त्यांनी या दोन्ही नेत्यांना मुंबईकरांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.

बडवे आणि कारकुनांच्या जुन्या वादाची आठवण

राज ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली होती, त्यावेळी त्यांनी 'विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय' अशी टीका केली होती. याच मुद्द्याचा आधार घेत शेलार यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे की, "घेरलं होतं मातोश्रीवरील विठ्ठलाला बडव्यांनी.. तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी..." राज ठाकरेंनी ज्या लोकांमुळे पक्ष सोडला, आज त्याच लोकांशी ते हातमिळवणी करणार का, असा बोचरा सवाल शेलार यांनी केला आहे.

"लाव रे तो व्हिडीओ"वरून खोचक टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत भाजपविरोधात रान पेटवले होते. आता शेलार यांनी तोच शब्दप्रयोग त्यांच्यावर उलटवला आहे. "लाव रे तो व्हिडीओ असे आता मुंबईकर म्हणतील, तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील," असे म्हणत शेलार यांनी दोन्ही नेत्यांच्या परस्परविरोधी विधानांची आठवण करून दिली आहे.

मुंबईच्या तिजोरीची सुरक्षा आणि मतदारांचे प्रश्न

या युतीचा मुख्य हेतू केवळ सत्तेची हाव असल्याचे शेलार यांनी सुचवले आहे. "एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार?" असा संशय व्यक्त करत त्यांनी मुंबईकरांच्या मनात असलेल्या भीतीला वाचा फोडली आहे. गल्लोगल्लीत मुंबईकर तुम्हाला जाब विचारतील आणि तुमच्या बदललेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >