Wednesday, December 24, 2025

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात भाविकांनी अर्पण केलेली, सोन्या-हिऱ्यांनी मढवलेली श्रीरामाची एक भव्य मूर्ती मंगळवारी सायंकाळी अयोध्येत दाखल झाली. १० फूट उंच आणि ८ फूट रुंद असलेली ही मूर्ती दक्षिण भारतीय शिल्पकलेचा अद्भुत नमुना असून, तिची अंदाजित किंमत २५ ते ३० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

तंजावर कलेची मोहोर आणि विशेष 'ग्रीन कॉरिडॉर' प्रवास

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

कर्नाटकापासून अयोध्या असे सुमारे १,७५० किलोमीटरचे अंतर एका विशेष व्हॅनद्वारे ६ दिवसांत पार करून ही मूर्ती रामलल्लाच्या नगरीत पोहोचली. तंजावर येथील निष्णात कारागिरांनी ही मूर्ती घडवली असून, यामध्ये रामलल्लाच्या मूळ मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती पाहायला मिळते. या मूर्तीमध्ये सोने, हिरे, पाचू (पन्ना) आणि नीलम यांसारख्या मौल्यवान रत्नांचा सढळ हस्ते वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एक दिव्य झळाळी पसरली आहे.

अंगद टीला येथे होणार स्थापना; ट्रस्टकडून तपासणी सुरू

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी माहिती दिली की, मंगळवारी दुपारी ३:३० च्या सुमारास ही मूर्ती मंदिर परिसरात आणली गेली. सध्या या मूर्तीचे वजन आणि धातूची तांत्रिक तपासणी सुरू आहे. ही मूर्ती अंदाजे ५ क्विंटल वजनाची असून ती 'अंगद टीला' (संत तुलसीदास मंदिराजवळ) येथे स्थापित करण्याचा प्राथमिक विचार सुरू आहे. या मूर्तीच्या अनावरणानंतर एका भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले जाईल, ज्यासाठी देशभरातील संत-महंतांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

२९ डिसेंबरपासून 'प्रतिष्ठा द्वादशी' उत्सवाचा प्रारंभ

योगायोगाने, ही मूर्ती अशा वेळी आली आहे जेव्हा राम मंदिर ट्रस्ट रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची दुसरी वर्षगांठ साजरी करण्याच्या तयारीत आहे. पंचांगानुसार, ३१ डिसेंबर रोजी 'प्रतिष्ठा द्वादशी' साजरी होणार आहे. या निमित्ताने २९ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या काळात अंगद टीला परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भूमिपूजन संपन्न; अयोध्येत उत्सवाचे वातावरण

ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या उपस्थितीत अंगद टीला येथे या उत्सवासाठी नुकतेच भूमिपूजन पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मंडप आणि भव्य मंचाची उभारणी सुरू झाली आहे. २९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात श्रीरामाचा अभिषेक, विशेष शृंगार, भोग आणि प्राकट्य आरती असे विधी पार पडणार आहेत. या सुवर्णमूर्तीच्या आगमनाने अयोध्येतील आध्यात्मिक वातावरणात अधिकच भर पडली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा