मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसेची अधिकृत युती जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर तिखट टीका केली आहे. “ही युती म्हणजे दोन अस्तित्वहीन पक्षांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड आहे. काही प्रसारमाध्यमे हे दृश्य जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे, पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र येत आहेत असे चित्र उभे करत आहेत. परंतु, कुठल्याही पक्षाला निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी जे करावे लागते, ते या दोन पक्षांनी केले आहे. या पलीकडे याचा दुसरा अर्थ काढण्याचे कारण नाही. या युतीमुळे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी माणूस नाही. ठाकरे बंधू एकत्र आले याचा मला आनंद आहे, पण यामुळे राजकीयदृष्ट्या मोठे फेरबदल होतील असा समज बाळगणे बाळबोधपणा आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "उबाठाने मुंबईकरांचा सातत्याने विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचे पाप त्यांनी केले. अमराठींवर हल्ले केले, त्यामुळे तेही त्यांच्यासोबत नाहीत. मुंबईत कोणीही ठाकरे बंधूंसोबत येणार नाही. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड फक्त भ्रष्टाचार आणि स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की भावनिक बोलतात, पण आता जनता त्यांना भुलणार नाही. मुंबईकरांनी महायुतीने केलेला विकास पाहिला आहे. विशेषतः मराठी माणसाला मुंबईत हक्काची घरे देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे. त्यामुळे मुंबईची जनता विकासावर महायुतीलाच कौल देईल. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाहीत. त्यांच्या गर्व आणि दुराभिमानामुळे मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले आहेत. मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, राज्य गाजवणारे नाहीत. ठाकरे बंधूंची युती प्रीतिसंगम नव्हे, तर भीतीसंगम आहे", असा टोलाही त्यांनी लगावला.
"ठाकरे विकासावर बोलले तर मी १ हजार रुपये देईन अशी घोषणा मी पूर्वी केली होती. पण माझे पैसे अजून वाचले आहेत. ते विकासाची एकही गोष्ट बोलत नाहीत. ही निवडणूक मुंबईच्या विकासाची आहे, त्यावर ते बोलू शकत नाहीत. कारण त्यांना २५ वर्षांचा हिशेब द्यावा लागेल. मिठी नदी, मराठी माणसाच्या घरांचा हिशेब द्यावा लागेल", असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नयेहिंदुत्वाच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष्य केले. "मी हिंदुत्वात जन्मलो आणि हिंदुत्वातच मरेन. मतांसाठी भगवी शाल घालणारे, रोज मत बदलणारे आम्ही नाही. मुंबई-महाराष्ट्र हिंदुत्ववादी आहे. जे हिंदुत्व सोडतील, लांगुलचालन करतील त्यांची अवस्था विधानसभेत दिसली आहे. आमचे हिंदुत्व व्यापक आहे, भारतीय जीवनपद्धतीवर आधारित आहे. प्रभू श्रीरामांना मानणाऱ्यांना आम्ही सोबत घेतो, त्यांची जात-धर्म पाहत नाही. पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये," असा घणाघात त्यांनी केला.






