मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या संभाव्य युतीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. संजय राऊत यांनी या युतीला 'ऐतिहासिक पर्व' संबोधल्यानंतर, भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांचा समाचार घेताना याला 'ऐतिहासिक पराभवाची नांदी' म्हटले आहे. "हे एकत्र येणे मुंबईसाठी नसून केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी केलेली हतबलतेची घोषणा आहे," अशा शब्दांत त्यांनी महायुतीची बाजू लावून धरली.
संजय राऊत : दोन्ही भावांचे '१२' वाजवणारे सूत्रधार
नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर वैयक्तिक टीका करताना म्हटले की, "संजय राऊत हे दोन्ही भावांचे (उद्धव आणि राज ठाकरे) १२ वाजवणारे एकमेव सूत्रधार आहेत. आज युतीचा ढोल वाजवला जात असला तरी त्याचा आवाज फुसका आहे. राज ठाकरेंची चिडचिड आणि राऊतांची घाई यातून केवळ पराभवाची कबुलीच समोर येत आहे." उद्धव ठाकरेंचा इतिहास मित्रपक्षांचे १२ वाजवण्याचा राहिला असून, राज ठाकरेंनी सावध राहावे, पुढचा नंबर त्यांचाच असू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईची तिजोरी लुटून 'मातोश्री-२' चे बांधकाम
मुंबईकरांच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्यांना टोला लगावताना बन म्हणाले, "मुंबईच्या तिजोरीचा कलश लुटून आता उपदेशाचे डोस देऊ नका. कलश मुंबईचा आणि बांधकाम 'मातोश्री-२' चे, हे सत्य मुंबईकरांना ठाऊक आहे. दिल्लीत सोनिया गांधींचे तळवे चाटणाऱ्यांनी आम्हाला मराठी अस्मिता आणि हिंदुत्व शिकवू नये. बूटचाटे कोण आहेत, हे महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षांत पाहिले आहे."
अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात भाविकांनी अर्पण केलेली, सोन्या-हिऱ्यांनी ...
अफजलखानाच्या वारसांसोबत 'तोरण' बांधण्याचे पाप
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप करत नवनाथ बन यांनी संताप व्यक्त केला. "ज्यांनी संभाजी महाराजांच्या नावाला विरोध केला, त्यांनाच सोबत घेऊन तुम्ही सत्तेसाठी तोरण बांधत आहात. हे अफजलखानाच्या वारसांसोबत तोरण बांधण्याचे पाप आहे. बाळासाहेब एक 'ब्रँड' होते, पण आताच्या वारसांचा मात्र बँड वाजला आहे. आता यांची मदार मराठी माणसावर नाही, तर 'राशीद मामू'वर आहे," अशी टीका त्यांनी केली.
वचननामा नाही, तर 'माफीनामा' सादर करा
मुंबईच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून बन यांनी उबाठा गटाला घेरले. "मेट्रोची कामे रोखून आणि कोस्टल रोडला विरोध करून तुम्ही मुंबईकरांचा अमूल्य वेळ चोरला आहे. बीडीडी चाळीतील घरे महाग केली, याला जबाबदार कोण? तुम्ही निवडणुकीसाठी वचननामा नाही, तर मुंबईकरांची दिशाभूल केल्याबद्दल 'माफीनामा' सादर केला पाहिजे," अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
मुंबईकरांचा कौल विकासालाच - भाजपचा दावा
मुंबईकर आता भावनिक घोषणांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास नवनाथ बन यांनी व्यक्त केला. "मारहाण, खंडणी आणि भयाचे राजकारण हीच उबाठा आणि मनसेची खरी ओळख आहे. मुंबईकरांना मारहाण करण्याचा तुमचा इतिहास जनता विसरलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुंबईकर केवळ विकासाला, म्हणजेच भाजपलाच ठाम कौल देतील," असेही त्यांनी शेवटी नमूद केले.






