“सोन्याची अंडी खाऊन झाली आता कोंबडीच कापायला निघाले"
“आमच्याकडे विकासाचा, तर त्यांच्याकडे खुर्चीचा अजेंडा”
मुंबई : काही लोक मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आधी अंडी खात होते, आता कोंबडीच कापून खाण्यासाठी एकत्र आले आहेत. अशा शब्दांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या नव्या युतीवर जहरी, आक्रमक टीका केली.
मुंबईतील बाळासाहेब भवन येथे कोल्हापूर व नाशिकमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्या वेळी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर शब्दबाणांचा वर्षाव केला.
नाशिक महापालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व प्रदेश सचिव राहुल अशोक दिवे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका आशा तडवी, ॲड. पूजा प्रवीण नवले, सुनील बोराडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. “दिवे यांचे सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध आहेत. जनतेशी त्यांची नाळ घट्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेना अधिक मजबूत झाली आहे. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरवू,” असे शिंदे म्हणाले.
कोल्हापूरमधूनही उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, महेश खांडेकर, संभाजी काशीद, राष्ट्रवादी बेस्ट कामगार युनियन सेनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष प्रताप गणपत पाटील आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर आणि मराठवाड्यातील मनसेचे चार जिल्हाध्यक्षही शिवसेनेत आले. हा प्रवेशाचा सिलसिला गेली साडेतीन वर्षे अखंड सुरू असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले.
लोकशाहीत युती-आघाड्या होत असतात; पण काही युती राज्य आणि जनतेच्या बळासाठी असतात महायुती तशी आहे, गेली साडेतीन वर्षे महाराष्ट्र पुढे नेते आहे. लोकाभिमुख, कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. “आता जे एकत्र आले आहेत ते सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आले आहेत,” असा थेट हल्ला त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर चढवला.
“लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांत महायुतीने विजय मिळवला आहे. जनतेनेच खरी-नकली शिवसेना कोणाची हे दाखवून दिले,” असे सांगत त्यांनी ‘ऐतिहासिक युती’च्या दाव्यांवर टीका केली. “ही स्वार्थाची, सत्तेची आणि अस्तित्वाची लढाई आहे. निवडणुकांनी त्यांना जागा दाखवली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
मुंबईच्या विकासावर बोलताना शिंदे आक्रमक झाले. “विकासाचा अजेंडा काय, मुंबईचा अजेंडा काय. या प्रश्नांवर त्यांच्या पत्रकार परिषदेत एकही शब्द नव्हता. आमच्याकडे सांगण्यासारखी भरपूर कामे आहेत,” असे सांगून त्यांनी क्लस्टर पुनर्विकास, इमारतींना ओसी देणे, पागडीमुक्त मुंबई करणे, पुनर्विकास योजना, रस्ते काँक्रीटीकरण, एसटीपी प्लांट, मेट्रो प्रकल्प, कारशेड, आरोग्य सुविधा दिल्याचे आणि देत असल्याचे सांगितले. कोविड काळातील घोटाळ्यातील सर्व मुद्द्यांवर विरोधकांना घेरले.
“मुंबईकराला खड्ड्यात घालणारे कोण? आम्ही सहा महिन्यांत मुंबई खड्डेमुक्त करू. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये १७ हजार घरांचा प्रकल्प मार्गी लावला आहे. १७ यूआरपी तयार झाले आहेत. टप्प्याटप्प्याने लाखो लोकांना घरे देणार,” असा ठोस दावा त्यांनी केला. गिरणी कामगारांना साडेबारा हजार घरे दिली, एक लाख जणांना घरे देणार,” असे स्पष्ट केले.
महालक्ष्मी रेसकोर्सची १२५ एकर जमीन आणि कोस्टलच्या १७० एकर जमिनीसह ३०० एकरात ‘सेंटर पार्क’ उभारण्याचा उल्लेख करत “मोठे उद्यान एक तरी केले का?” असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. “मुंबईकर सुज्ञ आहे; त्यांना विकास हवा आहे,” असे सांगत त्यांनी ‘स्वार्थी सेटलमेंट’ विरुद्ध ‘डेव्हलपमेंट’ असा स्पष्ट भेद केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून “उद्यापासून दररोज ४५ विमाने टेकऑफ घेणारआहेत. आमचा टेकऑफ बघा आणि त्यांचा लँडिंग बघा,” असा टोला त्यांनी लगावला. “महायुती टेम्पररी नाही; वापरा आणि फेका असा आमचा कारभार नाही. विकासाच्या मुद्द्यावर मराठी माणूस आमच्यासोबत आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






