Wednesday, December 24, 2025

महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्मूला ठरला! लवकरच होणार अधिकृत घोषणा

महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्मूला ठरला! लवकरच होणार अधिकृत घोषणा

ठाणे: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात जागा वाटपावरून ५ तास मॅरेथॉन चर्चा झाली. यावरून पुढील दोन दिवसात महायुतीकडून मोठी चर्चा होणार असल्याचा अंदाज आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी रात्री उशिरा सुरू झालेली ही बैठक पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु होती. ज्यात शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे देखील उपस्थित होते. राजकीय चर्चेपलिकडे अनेक विषयांवर हास्यविनोद करत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा पार पडली, अशी माहिती या बैठकीनंतर खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांना दिली. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कर्तृत्व आणि कार्यकौशल्याबद्दलही बराच वेळ या बैठकीत चर्चा झाली. ज्यात उपस्थित प्रत्येकाने मोदींसोबतचे आपले वैयक्तिक अनुभवही मांडले, असेही म्हस्के यांनी सांगितले.

ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील महापालिकांमधील युतीची घोषणा अंतिम टप्प्यात असल्याचे या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे. तसेच महानगरपालिका निवडणूक महायुती एकत्रितपणे लढणार असल्याचेही या बैठकीनंतर समजते आहे. दरम्यान महायुतीचा जागा वाटपाचा मुख्य फॉर्म्युला ठरला असला तरी येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर प्रभागस्तरावरील उमेदवारांच्या नावांवर चर्चा होईल. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महायुतीच्या वतीने जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >