Thursday, January 15, 2026

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, व्होटचोरी होणार, अशी घिसीपिटी कॅसेट बंद करावी", असा घणाघाती हल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उबाठा गटाला स्वतःच्या माणसांची काळजी घेता येत नसल्याने त्यांचे नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “उबाठा गटाने स्वतःच जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास संपवला आहे. त्यामुळे त्यांचे आमदार, नेते आणि गावोगावचे कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत. त्यांनी आत्मचिंतन करायला हवे की, लोकांनी त्यांना का सोडले? नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे करायला त्यांच्याकडे माणसे नव्हती. आता मुंबई तोडण्याचा मुद्दा काढून त्यांना काही साध्य होणार नाही. त्यांची ही घिसीपिटी कॅसेट आता कुणी ऐकत नाही.”

जनता भावनांवर नव्हे, विकासावर मतदान करते

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, हे संपूर्ण देशातील चार वर्षांच्या बालकालाही समजते, असे सांगत बावनकुळे पुढे म्हणाले, “व्होटचोरी आणि मुंबई तोडणे असे जुने मुद्दे आता जनतेला पटत नाहीत. उबाठा प्रत्येक निवडणुकीत असे भावनिक आवाहन करतो; पण महाराष्ट्राची जनता सुजाण आहे. ती भावनांच्या आधारावर नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे.”

मराठीच्या मुद्द्यावर बावनकुळे म्हणाले, “आम्ही सर्व मराठी माणसे आहोत. मराठी-मराठी करून तुम्ही मराठी भाषेचाच अपमान केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात विकसित मुंबई आणि विकसित महाराष्ट्र शक्य आहे, हे मतदारांना माहिती आहे. त्यामुळे यावेळी उबाठाला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात कमी मते मिळणार आहेत”, असा दावाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >