Wednesday, December 24, 2025

टाटा मोटर्सकडून ईव्ही गाड्यांची विक्रमी विक्री,संपूर्ण ईव्ही बाजारातील ६६% बाजार हिस्सा कंपनीकडून कॅप्चर

टाटा मोटर्सकडून ईव्ही गाड्यांची विक्रमी विक्री,संपूर्ण ईव्ही बाजारातील ६६% बाजार हिस्सा कंपनीकडून कॅप्चर

तब्बल २५०००० ईव्ही विक्रीचा टप्पा पार

मुंबई: टाटा मोटर्सने मोठ्या प्रमाणात बी कॉर्पोरेट रिकस्ट्रक्चरिंग केल्यानंतर ईव्हीकडे धोरणात्मक दृष्टीने लक्ष केंद्रित केले. ध्येयपूर्तीसाठी लक्ष गाठतान टाटा ईव्हीने एक नवा टप्पा गाठला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीत संपूर्ण ईव्हीमधील बाजारात ६६% बाजार हिस्सा (Market Share) नोंदवल्याचे स्पष्ट केले. भारतीय रस्त्यांवर २५०००० पेक्षा अधिक टाटा.इव्ही वाहनांची विक्री टाटा मोटर्सने केली. त्यामुळेच कंपनीने भारतातील वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहन सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

ही कामगिरी अशा टप्प्यावर साध्य झाली आहे, ज्या वेळी भारताच्या ऑटोमोटिव्ह बाजारात इलेक्ट्रिक मोबिलिटी काठावरून मुख्य प्रवाहात निर्णायकपणे प्रवेश करत आहे. या परिवर्तनात टाटा मोटर्सने सातत्याने मोलाची भूमिका बजावली आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये नेक्सॉन.इव्ही ही भारतातील पहिली मुख्य प्रवाहातील इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्यापासून टाटा.इव्ही ने सकारात्मक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीच्या माहितीनुसार नेक्सॉन.इव्ही या परिवर्तनात अग्रेसर राहिली असून संपूर्ण विक्रीत या कारने १००००० कारचा टप्पा पार केला आहे . इतकी वाढलेली विक्री नोंदवणारी भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार ठरली आहे.

आज भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेइकल्सपैकी सुमारे दोन-तृतीयांश म्हणजेच ६६ टक्के वाटा टाटा मोटर्सकडे आहे. कंपनीच्या मते ही कामगिरी कंपनीच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाची, मजबूत नेतृत्वाची साक्ष देते. व्यक्तिगत मोबिलिटीसाठी भारतातील सर्वात व्यापक इव्ही पोर्टफोलिओ- टियागो.इव्ही, पंच.इव्ही, नेक्सॉन.इव्ही, कर्व्ह.इव्ही आणि हॅरियर.इव्ही तसेच फ्लीट सेगमेंटसाठी एक्स्प्रेस-टी इव्ही यांच्या माध्यमातून टाटा मोटर्स सर्व प्रमुख बॉडी स्टाइल्स आणि किंमत श्रेणीत इलेक्ट्रिक मोबिलिटी सुलभ करत आहे.

या यशाबद्दल आनंद व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्रा यांनी सांगितले आहे की,'२५०००० ईव्ही विक्रीचा टप्पा पार करणे हे इलेक्ट्रिक मोबिलिटी कशा वेगाने भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे, याचे स्पष्ट द्योतक आहे. आमचे ग्राहक अधिक प्रवास करत आहेत, लांब पल्ल्याचे अंतर पार करत आहेत आणि दैनंदिन वाहन म्हणून इव्ही वर वाढता विश्वास दर्शवत आहेत. २०१८ मध्ये सुरू झालेला आमचा प्रवास केवळ वाहनविक्रीपुरता मर्यादित नव्हता तर स्वच्छ मोबिलिटीकडे वाटचाल करणाऱ्या भारतासाठी एक सक्षम ईकोसिस्टम उभारण्याचा तो प्रयत्न होता. सरकारची दूरदृष्टीपूर्ण धोरणे, पुरवठादार व चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर भागीदारांचे भक्कम पाठबळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टाटा.इव्ही ग्राहकांचा विश्वास व उत्साह या सर्वांच्या एकत्रित परिणामातून ही प्रगती शक्य झाली आहे. ईव्हीचा स्वीकार झपाट्याने वाढत असताना, इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व सेगमेंटमध्ये सहजप्राप्य करणे, ईकोसिस्टम अधिक मजबूत करणे आणि इंडिया-फर्स्ट तंत्रज्ञान व लोकलायझेशनमध्ये गुंतवणूक करणे ही आमची स्पष्ट वचनबद्धता आहे. या मार्गावर पुढे जात आम्ही भारतातील वाढत्या इव्ही बाजाराचे नेतृत्व करत राहू.'

अहवालातील माहितीनुसार २६% पेक्षा अधिक टाटा.इव्ही ग्राहक हे पहिल्यांदाच कार खरेदी करणारे असून नव्या ग्राहकांमध्येही इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वाढत असल्याचे स्पष्ट होते.वास्तविक वापराच्या आकडेवारीनुसार, टाटा.इव्ही मालक सरासरी दरवर्षी सुमारे २०००० किलोमीटर वाहन चालवतात, तर जवळपास २६००० ग्राहकांनी १००००० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार केले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाबाबतही ग्राहकांचा आत्मविश्वास वाढत असून, सुमारे ५० टक्के टाटा.इव्ही मालकांनी किमान एकदा तरी ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे. टाटा.इव्हीने भारतातील प्रत्येक प्रमुख राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गांवरून यशस्वी प्रवास करत महामार्गांसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सिद्ध केले आहे.

एकत्रितपणे पाहता, टाटा.इव्हीनी आतापर्यंत सुमारे १२ बिलियन किलोमीटर अंतर पार केले असून, यामुळे अंदाजे १.७ मिलियन टन कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जन (Carbon Commission) टाळले गेले आहे आणि सुमारे ८०० मिलियन लीटर इंधनाची बचत झाली आहे जे पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान आहे.

मजबूत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे इव्ही प्रवासाला बळ-

कंपनीच्या मते, एका सक्षम आणि व्यापक ईकोसिस्टमच्या माध्यमातून टाटा मोटर्स भारतातील इव्ही क्रांतीला गती देत आहे. होम चार्जिंग, सामुदायिक चार्जिंग आणि भागीदार सीपीओज यांच्या सहाय्याने टाटा.इव्ही नेटवर्कमध्ये सध्या २ लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध आहेत.टाटा.इव्ही चा चार्जिंग अ‍ॅग्रीगेटर २०००० पेक्षा अधिक नोंदणीकृत सार्वजनिक चार्जिंग पॉइंट्ससह देशातील सर्वात व्यापक कव्हरेज प्रदान करतो.

याशिवाय, टाटा.इव्हीचे सुपरफास्ट चार्जर्सचे नेटवर्कही देशातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक समजले जाते. भारतातील प्रमुख कॉरिडोर्सवर सध्या १०० मेगाचार्जिंग हब्स कार्यरत असून, प्रत्येक हबमध्ये १६ पर्यंत चार्जिंग पॉइंट्स आणि १२० केडब्ल्यू+ चार्जिंग वेग उपलब्ध आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >