विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार
नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंनाही ही स्पर्धा खेळणे बंधनकारक आहे. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू देखील ही स्पर्धा खेळताना दिसून येणार आहेत. विराट दिल्लीकडून, तर रोहित मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. विराट कोहली बंगळूरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पुनरागमन करणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना त्याला खेळताना पाहण्याची संधी मिळणार नाही. हा सामना बंद दाराआड खेळवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केसीए) ला चिन्नास्वामी स्टेडियमवर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने यातून मार्ग काढत स्टेडियममधील २ स्टँड जनतेसाठी खुले करण्याचा पर्याय शोधला होता. त्यामुळे २००० ते ३००० क्रिकेट चाहते हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहू शकत होते; परंतु कर्नाटक क्रिकेट सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
इतरवेळी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाते. पण यावेळी विराट कोहली आणि ऋषभ पंत देखील खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीचा पहिला सामना आंध्र प्रदेश संघाविरुद्ध होणार आहे. कोहली आणि पंत सोमवारी रात्री उशिरा बंगळूरुत दाखल झाले आहेत. या सामन्यापूर्वी विराट दिल्ली संघासोबत सराव करणार असल्याची अपेक्षा आहे. ४ जूनला आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतर या मैदानावर एकही सामना झाला नव्हता. त्यामुळे महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील सामने देखील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये हलवण्यात आले होते.






