पुणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार गटाने अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करताना उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावरुन शरद पवारांच्याच पक्षात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी शरद पवारांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा देत जाहीर केली.
राजीनामा देताना काय म्हणाले प्रशांत जगताप ?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार ! मी २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल! आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार; असे म्हणत शरद पवारांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला. त्यांनी स्वतःची भूमिका जाहीर करत राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे पुण्यातील शरद पवारांच्या पक्षाच्या राजकीय समीकरणांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.