यंदा १२ हजार ६३४.३५ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, भाजीपाला लागवड
अलिबाग : भाताचे कोठार म्हणून रायगडाची ओळख पुसली गेली असतानाच यंदा पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यासाठी नुकसानीचा ठरला. रब्बी हंगामात लागवड क्षेत्र वाढीसाठी यंदा कृषी विभागातर्फे प्रयत्न करण्यात आले असून, यंदा १२ हजार ६३४.३५ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य आणि भाजीपाला लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात हरभरा आणि इतर कडधान्यांची ८ हजार ५८ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६३.९ टक्के रब्बी पिकांची लागवड पूर्ण झाली असून, यावेळी पांढरा कांद्याचे लागवड क्षेत्र २०० ते ३०० हेक्टर क्षेत्राने वाढले जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात पावसाळी खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगाम सुरू होतो. जिल्ह्यात सरासरी १४ हजार १५०.६१ हेक्टर रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने वाल, चवळी, हरभरा, मूग, उडीद, मसूर, मटकी, मोहरी आणि इतर कडधान्यांची पेरणी केली जाते. वांगी, मिरची, कारली, दुधी, घोसाळी, तोंडली, सफेद कांदा, भेंडी, कलिंगड, टोमॅटो, दोडका, काकडी, पडवळ या भाज्यांची पेरणी करण्यात आलेली आहे. भात कापणी व मळणी झाल्यानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होते. यंदा पावसाचा मुक्काम वाढला असल्याने रब्बी हंगाम हा थोडा पुढे सरकला आहे. यंदा रब्बी हंगामाची पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
यंदा १२ हजार ६३४.३५ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, तर ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात हरभरा लागवड सरासरी ९७३.५ हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी करण्यात येते. यंदा हरभरा लागवड क्षेत्र २७३.५३ हेक्टरने वाढले असून, १२४७.०३ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे. आतापर्यंत ५८९. १४ हेक्टर क्षेत्रावर ४७.२४ टक्के हरभरा लागवड करण्यात आलेली आहे.
इतर कडधान्य ११३६३. ३२ हेक्टर क्षेत्रावर घेतले जाणार आहे. आजपर्यंत ७३२२.३२ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. इतर कडधान्य ६४.४४ टक्के लागवड पूर्ण करण्यात आलेली आहे. किट शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. त्यामुळे या कडधान्यांचे लागवड क्षेत्र वाढले जाणार आहे. वाल लागवड वाढीसाठीही कृषी विभागातर्फे प्रयत्न यंदा केले जाणार आहेत.
पांढऱ्या कांद्याची लागवड रखडली
अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याची लागवड यंदा पावसामुळे रखडलेली आहे. अलिबागमध्ये २५० हेक्टर क्षेत्रावर पांढरा कांद्याची लागवड केली जाते. कृषी विभागातर्फे पांढरा कांद्याचे क्षेत्र वाढीसाठी गेली वर्षभर प्रयत्न सुरू आहेत. बी लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. यंदा अडीचशे हेक्टर क्षेत्र हे पाचशे हेक्टर क्षेत्रपर्यंत वाढविण्याचा मानस कृषी विभागाने केला आहे.






