५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी
वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२ गावांचा विस्तीर्ण परिसर असलेल्या कुडूस येथील पोलीस दूरक्षेत्राचे रूपांतर आता स्वतंत्र पोलीस ठाण्यात होणार आहे. नागरिकांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या मागणीला यश आले असून, वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहत आणि गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारच्या गृहविभागाने या नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. कुडूस परिसर हा केवळ ग्रामीण भाग राहिला नसून, येथे कोकाकोला, ओनिडा, एस.एल. पॅकेजिंगसह चारशेहून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत. उद्योगधंद्यांमुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. या परिसरातून गेलेल्या वाडा-भिवंडी-मनोर या राज्य महामार्गावर नेहमीच अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या असते. अपुऱ्या मनुष्यबळावर ताण: सुमारे एक लाखाहून अधिक लोकसंख्या आणि ५२ गावांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आजवर केवळ ७ पोलिसांवर होती. अपुऱ्या मनुष्यबळामुळे चोरीचे मोठे गुन्हे, कामगार संघटना व मालकांमधील वाद तसेच इतर तंटे हाताळताना पोलिसांना मोठ्या अडचणी येत होत्या.
कायद्यासुव्यवस्थेसाठी महत्त्वाचे पाऊल
स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे या भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होणार आहे. नवीन रचनेनुसार, कुडूस पोलीस ठाण्यासाठी दोन पोलीस अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचारी इतके अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. गृहविभागाने घेतलेल्या या निर्णयाचे कुडूस आणि परिसरातील नागरिकांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. आता स्थानिक पातळीवरच नागरिकांचे प्रश्न आणि तक्रारी वेळेवर सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






