Wednesday, December 24, 2025

सावित्रीबाई फुले, संत सावता स्मारकांचा मार्ग मोकळा

सावित्रीबाई फुले, संत सावता स्मारकांचा मार्ग मोकळा

भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे जयकुमार गोरेंचे निर्देश

मुंबई : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या भूसंपादनाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करून त्यानंतर कार्यादेश लवकर जारी करण्यात यावा, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील नायगाव (ता. खंडाळा) येथे उभारण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी आवश्यक असलेली जमीन तत्काळ संपादित करावी. सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजाला दिशा देणारे असून, त्यांच्या स्मृती जपणारे स्मारक भव्य व दिव्य स्वरूपाचे असावे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

सोलापूर जिल्ह्यातील अरण (ता. माढा) येथे असलेल्या संत शिरोमणी सावता महाराज स्मारकाच्या विकासासाठी देखील स्वतंत्र आढावा घेण्यात आला. या बैठकीत तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावी, तसेच विकास आराखड्यातील कामांना गती देण्याच्या सूचना मंत्री गोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >