मुंबई : बहुचर्चित नवी मुंबई विमानतळाला ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्याला मान्यता मिळून लवकरच या विमानतळाचे नामकरण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सेवेत येत आहे, याचा मला आनंद आहे. या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तो प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, त्यावर कारवाई चाललेली आहे. आम्ही त्यासंदर्भात केंद्रातल्या सर्व नेत्यांनाही भेटलो असून पंतप्रधानांनीही त्याबाबतचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळेल आणि लवकरच या विमानतळाचे नाव हे दिबा पाटील विमानतळ होईल," असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.






