Wednesday, December 24, 2025

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे  दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. जेमीमाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरीत विक्रमी धावांचा पाठलाग करताना अविस्मरणीय शतक झळकावले होते. जेमिमाहला या स्पर्धेच्या सुरुवातीला काही खास करता आले नाही. मात्र जेमीने निर्णायक क्षणी कमबॅक करत भारतासाठी बहुमुल्य योगदान दिले. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर आता श्रीलंकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. दिल्ली कॅपिट्ल्स फ्रँचायजीने डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमाआधी कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेग लॅनिंग हीच्या जागी जेमीला नेतृत्वाची धुरा देण्यात येणार आहे.

दिल्लीचे गेल्या २ हंगामात मेग लॅनिंग हीने नेतृत्व केले होते. जेमीच्या कर्णधारपदी २३ डिसेंबरला नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत २३ डिसेंबरला अधिकृत घोषणा केली जाणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, जेमीला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमासाठी गेल्या महिन्यात मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी जेमीला कर्णधार करण्याचे संकेत दिले होते. दिल्लीने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हीला ऑक्शनद्वारे आपल्या गोटात घेतले. त्यानंतर पार्थ जिंदाल यांनी भारतीय खेळाडूला कर्णधार करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे लॉरा कर्णधार होणार नसल्याचे स्पष्ट आहे. अशात आता जेमीची कर्णधारपदी वर्णी लागणार असल्याचं निश्चित समजले जात आहे.

जेमीची डब्ल्यूपीएल कारकीर्द

जेमीने आतापर्यंत डब्लूपीएलच्या इतिहासातील ३ हंगामात एकूण २७ सामने खेळले आहेत. जेमीने या २७ सामन्यांमधील २४ डावांत ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जेमीने २८.२६ च्या सरासरीने आणि १३९.६६ च्या स्ट्राईक रेटने ५०७ धावा केल्या आहेत.

जेमीची उपांत्य फेरीत ऐतिहासिक खेळी

जेमीने नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऐतिहासिक असं शतक झळकावलं होतं. ऑस्ट्रेलियाने भारताला त्या सामन्यात अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ३४० धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान जेमीमाह रॉड्रिग्स हीच्या शतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केले होतं. जेमीने त्या सामन्यात आक्रमक खेळी करत नाबाद १२७ धावा करून भारताला विजयी केले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा