ज्यांना पिढ्यांच्या अभिरुचीचा अडथळा नाही, अशा गोड गळ्याच्या मोहम्मद रफी यांची आज १०१ वी जयंती. अभिजीत कुलकर्णी यांनी त्यानिमित्ताने सांगितलेल्या त्यांच्या आठवणी.
हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं साक्षात एक स्वप्न म्हणजेच गाणमाधुर्य, गोड गळा लाभलेले दैवी अजरामर आवाजाचे मोहम्मद रफी!
२४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची १०१ वी जयंती अर्थात जन्मशताब्दी वर्षपूर्ती. रफी साहेबांचा आवाज कानावर पडला नाही, असा एकही दिवस संगीत रसिकांचा गेला नाही. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी कोटला सुलतानपूर पंजाब येथे झाला. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी गायनास सुरुवात केली. उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल भट्ट, फिरोज निजाम यांच्याकडे ते शास्त्रीय संगीत शिकले. १९४५ मध्ये ‘गाव की गोरी’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. १९४८ दरम्यान महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हुसनलाल भगतराम व रफी यांच्या पथकाने रातोरात ‘सुनो ए दुनियावालो बापूजी की अमर कहाणी ’ हे गाणे तयार केले होते. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या निवासस्थानी गाण्यासाठी खास रफींना आमंत्रित केले होते. १९४८ मध्ये पंडित नेहरूंकडून भारतीय स्वातंत्र्यदिनी रौप्य पदक देऊन गौरविले. तसेच भारत सरकारकडून १९६७ दरम्यान ‘पद्मश्री’ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मराठी गीतांशी अजरामर नाते ऋणानुबंध : अनेक वक्त्यांचे आवडते श्रोते अशी ओळख असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना व्यंगचित्रांसोबत चित्रपट आणि संगीताची सुद्धा आवड आहे. हीच आवड त्यांचे वडील स्व. श्रीकांत ठाकरे यांना होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक मोहम्मद रफी हे श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच मराठी भक्तिगीत गायला लागले.
श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी यांच्या मैत्रीचे सूर : मोहम्मद रफींनी मराठीत पहिल्यांदा १९५५ मध्ये गाणे गायले होते. ‘शिर्डीचे साईबाबा’ या चित्रपटातील काहे तीरथ जात रे भाई, शिर्डी जाकर देख साई. या चित्रपटाचे संगीतकार होते पांडुरंग दीक्षित. पण ‘काहे तीरथ जात रे भाई’ या गाण्याला मराठीत म्हणता येणार नाही, कारण चित्रपट मराठी असला तरी गाण्याचे बोल हिंदी होते. त्यानंतर त्यांनी १९६७ साली प्रदर्शित झालेल्या ‘श्रीमंत मेहुणा पाहिजे’ या चित्रपटात पहिल्यांदा ‘ही दुनिया बहुरंगी’ हे गीत गायलं आणि हेच त्यांच पहिलं मराठी गीत ठरलं. त्यानंतर रफींनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या श्रीकांत ठाकरे यांच्या ‘शुरा मी वंदिले’ या चित्रपटात गाणी गायली होती. हा चित्रपट फारसा हिट झाला नाही पण मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे यांची चांगली मैत्री झाली. इथूनच रफींच्या नॉनफिल्मी मराठी गाण्यांचा एक अध्याय सुरू झाला. याच दरम्यान कवी वंदना विटणकर यांच्या काही कविता गीत रूपाने आल्या होत्या.
श्रीकांत ठाकरे यांच्या संगीतात रफी साहेबांनी गायलेली काही मराठी गाणी :
१. अगं पोरी संबाल दर्यान तुफान आयलाय
२. प्रभू तू दयाळू कृपावंत आता
३. शोधिसी मानवा राउळी मंदिरी
४. प्रकाशातले तारे तुम्ही
५. हा छंद जीवाला लावे पिसे
६. नको भव्य वाडा
७. प्रभू रे खेळ तुझा न्यारा
मोहम्मद रफींना देवनागरी लिपी येत नव्हती पण श्रीकांत ठाकरे यांना उर्दूचे उत्तम ज्ञान होते. त्यांनी सर्व गाणी उर्दूत लिहून रफींच्या हाती देत. रफींचे मराठीतील पहिलं भक्ती गीत म्हणजे ‘शोधिसी मानवा, राउळी मंदिरी’ ही खास आठवण गीतकार वंदना विटणकर यांच्या ‘हे गीत जीवनाचे’ या पुस्तकात सांगितली आहे.
ज्येष्ठ पार्श्वगायक संगीतकार सुधीर फडके व मोहम्मद रफी : ‘दरार’ चित्रपटाचे संगीत सुधीर फडकेंनी दिले होते. त्यांच्या गाण्याचा किस्सा म्हणजे सुधीर फडकेंनी रफींचे सेक्रेटरी झहीर यांना फोन केला व म्हणाले की, मी रिहर्सल करिता आपल्या वांद्रे येथील ‘रफी मेन्शन’ येथे येत आहे साहेबांना निरोप द्या. तेव्हा झहीर यांनी त्याप्रमाणे रफींना निरोप दिला. निरोप मिळताच रफी सेक्रेटरी झहीर यांना म्हणाले, सुधीर फडके हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत. तेव्हा रिहर्सलसाठी माझ्या घरी येण्याचा त्रास त्यांना मला द्यायचा नाही. त्यांचा मान ठेवण्यासाठी मलाच त्यांच्या घरी रिहर्सल करिता गेले पाहिजे. त्याप्रमाणे झहीरना बाबूजींना निरोप देण्यास सांगितले. तसा निरोप बाबुजींना मिळालाय, अशी खात्री झाल्यानंतर रफी साहेब थेट बाबूजींच्या दादर येथील शिवाजी पार्क येथील निवासस्थानी ‘दरार’ चित्रपटांच्या गाण्यांच्या रिहर्सल करिता पोहोचले.
सुधीर फडकेंच्या लग्नात सुंदर मखमली गोड आवाजात सुस्पष्ट भाषेत रफींनी मंगलाष्टके म्हटली, अशी खास आठवण बाबूजी अर्थात सुधीर फडकेंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे. गीतकार आनंद बक्षी सांगतात, माझ्या उमेदीच्या व झगडत्या काळात ‘जब जब फुल खिले’ या माझ्या गीतांना रफी साहेबांच्या आवाजाचा पदस्पर्श झाला आणि मला सोनेरी यश लाभले. नंतर मी मागे वळून पाहिले नाही. वांद्रे येथे घर घेतल्यानंतर प्रचंड द्विधा मनस्थितीत सापडले होते. कारण त्यांनी मुलगा राकेशच्या प्रवेशासाठी वणवण फिरूनही त्यांना शाळेत प्रवेश मिळत नव्हता. तेव्हा चिंताग्रस्त चेहऱ्यामागील विवंचनेचे कारण विचारणारा रफी साहेबांचा हात जेव्हा त्यांच्या खांद्यावर पडला. तेव्हा बक्षींच्या अश्रूंचा बांध फुटला. तेव्हा राकेशच्या शाळा प्रवेशाचे कारण समजताच दुसऱ्या दिवशी रफी साहेब, आनंद बक्षी व मुलगा राकेश बक्षी शाळेत पोहोचले. शाळेत पोहोचताच शाळेच्या प्रिन्सिपलने रफी यांना पाहताच अभिवादन केले आणि तत्काळ राकेशला शाळेत प्रवेश मिळाला. प्रवेशाची औपचारिकता आटोपल्यानंतर प्रिन्सिपल साहेबांचा निरोप घेण्यासाठी गेले असताना त्यांनी रफींना शाळेतल्या मुलांसाठी एखादे गाणं म्हणावे असे विनंती केली, जी रफींनी अत्यंत विनम्रतेने मान्य केली. सगळ्यांसाठी जिव्हाळा असलेले व्यक्तिमत्त्व मी आश्चर्यचकित होऊन पाहत होतो. रफी साहेबांसारखी माणसं एखाद्या वेळेस जन्मास येतात.
संगीतकार सी. रामचंद्र : रफी हा एकमेव गायक असा होता, ज्याने गायनातले किती तरी आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनही त्याने कोणाची नक्कल न करता स्वतःच्या आवाजात अजरामर गायला. रफी साहेब हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. काही संगीतकारांना रफींच्या गाण्यांचे मानधन देणे परवडत नसे. अशा वेळेस ते फक्त छोटेसे मानधन घेत. प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते राकेश रोशन दिग्दर्शित ‘आपके दिवाने’ या पहिल्या चित्रपटासाठी रफींनी शीर्षकगीत गायले पण गाण्याचे मानधन एकही रुपया घेतले नाही. किशोरकुमार यांच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ ‘एक रुपया’ मानधन घेतले असे म्हटले जाते.
ख्यातनाम संगीतकार नौशाद अली : नौशादजी यांनी संगीतबद्ध केलेला लोकप्रिय चित्रपट म्हणजे १९५१ साली प्रदर्शित झालेला ‘बैजू बावरा’ यात ‘राग दरबारी’ यातील गाणे ‘ओ दुनिया के रखवले सुन दर्द भरे मेरे नाले’ हे गाणे इतक्या उच्च स्वरात गायले की, गाणे जगप्रसिद्ध झाले; परंतु हे गाणे हायरेंजमध्ये गायल्याने रफी साहेबांचा आवाज बसला. ते काही महिने गाऊ शकले नव्हते; परंतु त्यांनी पुन्हा पुनरागमन केले. १९७१ दरम्यान नौशाद यांनी पुन्हा एकदा ‘ओ दुनिया के रखवाले’ नव्याने रफी साहेबांच्या आवाजात स्वरबद्ध केले. १९५१ साली गायल्या गेलेल्या त्यापेक्षा हजारपटीने उच्चतम हायरेंजमध्ये रफी गायले होते, अशी आठवण रफी साहेबांविषयी नौशादजी यांनी दूरदर्शनवर दिलेल्या मुलाखतीत सांगितली.
पार्श्वगायक पद्मश्री महेंद्र कपूर : मोहम्मद रफी हे गायक म्हणून फार महान होते; परंतु माणूस म्हणून ते खूप मोठे होते, खूप साधे सरळ होते. दुनियादारी त्यांना माहिती नव्हती. महेंद्र कपूर सांगतात की, रफीसाहेब नेहमी मला सांगायचे कोणत्याही क्षेत्रात टिकायचे असेल, तर तीन गोष्टी लक्षात ठेव. डोळे नेहमी कोणाही समोर मोठे करून बघू नये, कोणासोबत द्वेषपूर्ण भांडण करू नये, आपले मुख्य उद्दिष्ट कोणालाही सांगू नये, स्वतःचे चारित्र्य नेहमी स्वच्छ ठेवावे. व्यक्ती नेहमी शीलवान, गुणवान असला पाहिजे. मग दुनियेमध्ये तुम्हाला कोणी पराजित करू शकत नाही. तसेच हा तुझा उस्ताद आहे ना याला काही येत नाही ही सगळी (अल्लाह): परमेश्वराची कृपा तिथूनच सगळे येते.
रफींचे एक साम्राज्य होते आणि त्याला टक्कर देण्यासाठी हरहुन्नरी पार्श्वगायक किशोरकुमार सज्ज होते. ही स्पर्धा व्यावसायिक स्तरावर होती. व्यक्तिगत जीवनात रफी साहेब आणि किशोरदा अत्यंत घनिष्ठ चांगले मित्र होते. जून १९७५ ते मार्च १९७७ दरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. तेव्हा त्याचा फटका सर्वांना बसला होता. पार्श्वगायक किशोरकुमार यांच्या गाण्यावर बंदी आणली होती. ही गोष्ट जेव्हा रफींना समजली तेव्हा रफी साहेबांनी थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व काँग्रेसचे नेते खासदार संजय गांधी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा तत्काळ किशोरकुमार यांच्या गाण्यांवरील बंदी उठवण्यात आली. जेव्हा ही गोष्ट किशोरकुमार यांना समजली तेव्हा त्यांनी रफी साहेबांचे आभार मानले. आपली जागा कोणीतरी घेऊ पाहत आहे, असे म्हणत रफींनी किशोरकुमार यांचा कधीच द्वेष केला नाही. उलट किशोरकुमारांना रफी साहेब आपला छोटा भाऊ मानत. किशोरकुमार यांनीही आपल्याला मिळणाऱ्या यशाचा गर्व कधीच रफींसमोर केला नाही. मोहम्मद रफी व किशोरकुमार या दोन अजरामर गायकांची घट्ट मैत्री होती, याचे अनेक किस्से देखील आहेत.
तुम मुझे यू भुला ना पाओगे : ३१ जुलै १९८० रोजी रफी साहेब यांचे निधन झाल्याची बातमी किशोरकुमार यांना समजताच ते आणि त्यांचा मुलगा अमितकुमार याला सोबत घेऊन रफींच्या घरी पहोचले. त्यावेळी रफींच्या घरी किशोरकुमार आले होते. रफींच्या पार्थिवाजवळ बसून रफींचे पाय स्वतःच्या हातात व डोक्याशी घेऊन तासंतास किशोरदा रडत होते अगदी जनाजा उठेपर्यंत. ऑगस्ट १९८० दरम्यान रफी गायनाच्या कार्यक्रमासाठी परदेशी जाणार होते व परत भारतात येताना सोबत डायलिसीस मशीन घेऊन येणार होते. कारण गोरगरिबांच्या आजारपणात मोफत उपलब्ध डायलिसीस मशीनची सेवा राहावी म्हणून हॉस्पिटलला दान देणार होते. पण परदेशी दौऱ्यापूर्वीच रफी साहेबांचे आकस्मित निधन झाले.