Wednesday, December 24, 2025

आंबा बागेमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

आंबा बागेमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

खालापूर : थंडीच्या दिवसात आंब्यांना उत्तम मोहर आला आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडीमुळे आंब्यावर तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे आलेला मोहर वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. आठ दिवसांनी फवारणी करूनसुद्धा कीड नियंत्रणात येत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन करून नवीन औषध उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

पाच ते दहा वर्षांच्या एका आंब्याच्या फवारणीसाठी ५० ते ६० रुपये खर्च येतो. त्याचबरोबर २५ ते ३० वर्षांच्या एका आंब्याच्या फवारणीचा खर्च १५० ते २०० रुपये इतका खर्च येतो. तसेच कृषी विभागाकडून कीटकनाशके औषध मिळत असली तरीसुद्धा ती तेवढी प्रभावी नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. सध्या आंबा बागेमध्ये तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, दोन औषधे बदली करून पुन्हा लॅबमध्ये पाठवून त्यांची गुणवत्ता तपासली जाईल व पुढील आठवड्यात शेतकरीवर्गास आंब्याच्या तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे खालापूर तालुका कृषी अधिकारी, सुनील निंबाळकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment