उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर निशाणा
‘सच्चा जिता, हार गया झूठा, जनताने दिया उबाठा को जमालगोटा’!
मी झोपायला नाही, झोप उडवायला आलोय
मुंबई : 'टोपणे मारण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करावे' फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढली असता का? कोण असली आणि कोण नकली, हे जनतेने दाखवून दिले, असे स्पष्ट करत शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर निशाणा साधला.
आम्ही अनेक योजना आणल्या, विकासाला चालना दिली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या मतांची बेरीज केली तरी एकट्या शिवसेनेची मते जास्त आहेत. हा विजय इतिहास घडवणारा आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांची आहे", याची आठवणही शिंदे यांनी करून दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी उबाठावर जोरदार टीका केली. २५ वर्षे सत्तेत असणाऱ्या उबाठासाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी होती. कोविडमधला खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर, बॉडीबॅग घोटाळे करणाऱ्यांना मुंबईकर त्यांची जागा दाखवतील. सच्चा जिता, हार गया झूठा, जनताने दिया उबाठा को जमालगोटा’, अशी शायरी करीत ठाकरेंची खिल्ली उडवली. 'मी झोपायला नाही, झोप उडवायला आलोय', असा इशारा त्यांनी दिला. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचा चांदा ते बांदा विस्तार
नगर परिषद निवडणुकांबाबत बोलताना शिंदे यांनी शिवसेनेचा चांदा ते बांदा विस्तार झाल्याचे सांगितले. "लोकसभेत आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता, विधानसभेतही चांगला होता. कमी जागा लढून जास्त जिंकल्या. आमदार नसलेल्या ठिकाणीही नगराध्यक्ष निवडून आले. राज्यात ६२ नगराध्यक्ष आहेत, हा आकडा ७० पर्यंत जाईल. यात ३३ लाडक्या बहिणी नगराध्यक्ष झाल्या. उबाठा आणि महाविकास आघाडीने कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले होते. जे घरी बसले, त्यांना जनतेने कायमचे घरी बसवले. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नगराध्यक्षांपेक्षा शिवसेनेचे जास्त आहेत. सर्वसामान्यांची नाळ शिवसेनेला जोडलेली आहे, ती कधीच तुटणार नाही. शिवसेनेला हरवणे अशक्य आहे", असेही एकनाथ शिंदे म्हणाले.






