मुंबई : दहशतवाद रोखण्यासाठी आणि शेजारी राष्ट्रांबरोबर असलेल्या प्रादेशिक वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने उच्च तीव्रतेचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन युद्धासाठी नेहमी तयार असले पाहिजे, असे महत्त्वाचे विधान भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान महोत्सवांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट कार्यक्रमात बोलताना चौहान यांनी भविष्यातील बदलते युद्धांचे स्वरूप, तंत्रज्ञान आणि सामरिक दृष्टिकोनावर भाष्य केले.
अनिल चौहान यांनी पाकिस्तान आणि चीन यांचे नाव न घेता म्हटले की, भारताने कोणत्या प्रकारचे धोके आणि आव्हानांसाठी तयार असले पाहिजे? हे दोन तथ्यांवर आधारित असले पाहिजे. आपल्या शेजारचे दोन्ही देश अण्वस्त्रधारी देश आहेत. म्हणून आपण त्या पातळीपर्यंत प्रतिबंधकतेचे उल्लंघन होऊ देता कामा नये.
बदलत्या युद्धशैलीबाबतही चौहान यांनी भाष्य केले. ते म्हणाले, युद्धभूमी आता केवळ जमिनीपुरती मर्यादित राहिलेली नाही. युद्धक्षेत्राचा विस्तार आता अनेक क्षेत्रांपर्यंत झाला आहे. तंत्रज्ञानामुळे युद्धात क्रांतिकारक बदल घडले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, हायपरसॉनिक शस्त्रे, प्रगत सेन्सर्स आणि डेटा विश्लेषणामुळे युद्ध अधिक वेगवान आणि बुद्धिमान बनत आहे. मानव विरुद्ध मानव याऐवजी मशीन विरुद्ध मशीन अशी युद्धाची दिशा झुकत असल्याचेही त्यांनी नमूद केले.






