महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू
नागपूर : राज्यातील महापालिका निवडणुकांची अधिकृत रणधुमाळी आता रंगात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होताच काँग्रेस पक्षाने निवडणूक मैदानात आक्रमक पाऊल टाकत महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला असून महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून जोरदार प्रचार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
काँग्रेसने या निवडणुकांकडे अत्यंत गांभीर्याने पाहत व्यापक तयारी केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विविध आढावा बैठका घेत प्रचाराची दिशा, स्थानिक मुद्दे, उमेदवार निवड आणि रणनितीवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतरच अनुभवी नेते, राष्ट्रीय पातळीवरील चेहरे तसेच लोकप्रिय लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनीक हे देखील प्रचारात सक्रिय भूमिका बजावणार आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांमुळे प्रचाराला बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सध्या तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय खासदार रजनीताई पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, आमदार अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, भाई जगताप यांचाही यादीत समावेश आहे.
तसेच कन्हैया कुमार, आमदार जिग्नेश मेवाणी, माजी मंत्री वसंत पुरके, हुसेन दलवाई, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, हनुमंत पवार यांच्यासह अनेक अनुभवी व तरुण नेते प्रचारात उतरणार आहेत. महापालिका निवडणुकांत स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि महागाईसारख्या मुद्द्यांवर काँग्रेस आक्रमक प्रचार करणार असल्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत.






