नवी मुंबई : भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी पहिली उड्डाण सेवा सुरू होत आहे. सिडकोच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन पहिल्याच दिवशी ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्ससह होणार असून, मुंबई महानगर प्रदेशासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन सुरू होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासातील सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे. भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि सर्वसमावेशक विकासाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत अनेक दशकांचा प्रवास असलेल्या या प्रकल्पामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार असून, नियोजित मल्टी-एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे. कमळाकृती संकल्पनेवर आधारित भव्य टर्मिनल रचना ही विमानतळाची वेगळी वास्तुशिल्पीय ओळख ठरत असून, शाश्वत विकास आणि आधुनिक अभियांत्रिकीचे हे प्रतीक मानले जात आहे.
हे विमानतळ सुरू झाल्याने नवी मुंबईसह पुणे, ठाणे, पनवेल, रायगड व कोकणातील नागरिकांसाठी हवाई प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच रोजगारनिर्मिती, पर्यटनवाढ आणि औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. महामार्ग, मेट्रो, रेल्वे व मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी अधिक बळकट होणार आहे.






