आपल्या बाबांचा व्यवसाय पाहून तिने उद्योजक होण्याचं स्वप्न पाहिलं. त्यात पूर्ण गुंतून प्रशिक्षण घेऊन उद्योग उभारला. सुरुवातीला अपयश आलं पण ती डगमगली नाही. पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली. उद्योगात स्थिरावत असताना तिला कर्करोगाने गाठलं. यावेळी पण ती डगमगली नाही. कर्करोगावर मात करत ती पुन्हा उभी राहिली. आपला उद्योग २० कोटी रुपयापर्यंत वाढवला. ही प्रेरणादायी गोष्ट आहे पेपरडमच्या रितूरीचा जैन यांची. रितू रांची येथे ४० सदस्यांच्या संयुक्त कुटुंबात वाढली. तिचे वडील छपाईचा व्यवसाय चालवत होते आणि तिची आई गृहिणी होती. तिने तिचे शालेय शिक्षण व्ही. व्ही. नगर येथील टी अॅण्ड टीव्ही हायस्कूलमध्ये पूर्ण केले आणि २००५ मध्ये तिने बी. एस्सी. आणि २००७ मध्ये गुजरात विद्यापीठातून एम. एस्सी. पदवी मिळवली.
बायोटेक्नॉलॉजीमध्ये एमएससी पूर्ण केल्यानंतर, ती पीएचडी करण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये फेलोशिपसाठी गेली. तिचे सहकारी मित्र प्रयोगशाळांमध्ये बरेच तास घालवत असताना, रितूला कॅम्पसच्या बाहेरील जीवन आकर्षित करत होते. म्युझिक ट्रिव्हिया नाईट्स, सांस्कृतिक महोत्सव आणि सामुदायिक स्वयंसेवा यात ती भाग घेत असे. हे सगळं पाहून तिच्या प्राध्यापकांनी तिला विचारले की हा कोर्स सुरू ठेवायचा आहे का...? या प्रश्नानंतर तिला जाणवले की, या अभ्यासक्रमासाठी आपण तयार नाही. तिने आपला गाशा गुंडाळून सुरतेकडे कूच केले. पुढील काही वर्षे ती उद्योग करण्याच्या नवीन संधी शोधत राहिली. तिने विविध व्यवसायांमध्ये भाग घेतला, अहमदाबादमधील एका आर्ट गॅलरीमध्ये काम केले, सुरतमध्ये युवा अनस्टॉपेबलसाठी एक एनजीओ चॅप्टर सुरू केला आणि तिच्या वडिलांना त्यांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये मदत केली. मग एके दिवशी, एनजीओमध्ये एका सर्जनशील प्रकल्पावर काम करत असताना, तिला काहीतरी वेगळे आढळले. हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला कागद पाहून ती थबकलीच. तो कागद एकवेळ वापरण्यायोग्य आणि सुंदर होता. तो कागद पाहून तिला प्रश्न पडला की जर हत्तीच्या विष्ठेपासून कागद बनवणे ही शक्य असेल, तर इतर कोणते नैसर्गिक साहित्य कागद निर्मितीसाठी वापरले जाऊ शकते? तिने संशोधन सुरू केले आणि तिचा मार्ग अखेर तिला सांगानेर, जयपूर येथे घेऊन गेला. शतकानुशतके जुन्या हस्तनिर्मित कागदाच्या परंपरांसाठी प्रसिद्ध असलेले असे हे शहर आहे.
२०१२ मध्ये तिचे स्वप्न आकार घेऊ लागले. गुजरातमध्ये रितूला कापणीनंतर टाकून दिलेले केळीचे देठ आणि कापड कारखान्यांमधून निघालेले कापडाचे तुकडे या टाकाऊ वस्तूंमध्ये कागद विपुल प्रमाणात दिसला. त्याच सुमारास, तिची भेट काही आर्किटेक्चर विद्यार्थ्यांशी झाली आणि त्यांनी एकत्र येऊन ही कल्पना शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी एका कंपनीची नोंदणी केली. केळीचे धागे आणि कापडाच्या कचऱ्यावर काम करण्यास सुरुवात केली. एका लहान अशा तात्पुरत्या स्टुडिओमध्ये सुरुवातीची उत्पादने डिझाइन केली. त्यावेळी रितूने उत्पादन निर्मितीचा विचार केला नव्हता. २०१३ मध्ये जेव्हा तिच्या सासऱ्यांनी तिला ३ लाख रुपयांची रक्कम देऊ केली आणि तिच्या आवडीचे काम करण्याचे सुचवले तेव्हा परिस्थिती बदलली. तिचा नवराही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. रितूला तिच्या उत्पादनांची बाजारपेठ माहीत होती. काय बनवायचे आहे हे माहीत होते. त्यामुळे तिने उद्योगात उडी घेतली.
अशाप्रकारे पेपरडमचा जन्म झाला. सुरुवातीची काही वर्षे सोपी नव्हती. रितू घरोघरी जाऊन वितरक आणि व्यापाऱ्यांना तिचा कागद घेऊन जाण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करायची. कागद टिकणार किती याची कोणालाच पर्वा नव्हती. कागदाची किंमत किती हाच प्रश्न विचारला जाई. हाताने तयार केलेला कागद, बाजारात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कागदापेक्षा महाग होता. त्याची निर्मिती प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असायची. आव्हाने फक्त उत्पादन खर्चापुरती मर्यादित नव्हती. या उद्योगात महिला असल्याने वेगळेच आव्हान होते. विक्रेते तिला गांभीर्याने घेत नव्हते. त्यांना वाटत असे की, रितू वाटाघाटींमध्ये सहज हार मानेल. सुरुवातीला, ती अनेकदा असे करत असे. पण कालांतराने, ती तिच्या पायावर उभे राहण्यास शिकली. तिला जाणवले की नाही म्हणणे हे हो म्हणण्याइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या कामाचे देखील मूल्य आहे. उत्पादन दर्जा वाढवण्यासाठी तिने ब्लॉक प्रिंटिंग, जरी कोटिंग्ज, भरतकाम आणि स्क्रीन प्रिंटिंगसारखे डिझाइन घटक सादर करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे तिचा कागद केवळ कार्यात्मकच नाही तर सौंदर्यात्मक बनला. हा बदल यशस्वी झाला. हळूहळू, ग्राहकांना हे लक्षात येऊ लागले. सुरत आणि मुंबईतील डिझायनर्स आणि प्रिंटिंग प्रेसनी ऑर्डर देण्यास सुरुवात केली. पेपरडमला त्याचा मार्ग सापडला. २०१७ ते २०१९ दरम्यान, व्यवसाय चांगला चालला होता. हस्तनिर्मित कागदांव्यतिरिक्त, कस्टम बॉक्स आणि पेपर बॅग तयार करण्यास पेपरडमने सुरुवात केली. त्यांनी ऑफर वाढवल्या आणि आपल्या क्लायंटशी मजबूत संबंध निर्माण केले. २०२० मध्ये कोरोनामुळे अवघे जग बंद पडले. पण काहीतरी आश्चर्यकारक घडले. लोक रितूला फोन करू लागले. रंगीत हस्तनिर्मित कागदपत्रे आहेत का असे विचारू लागले. लोक घरीच अडकले होते. छंदापोटी म्हणा किंवा वेळ घालवण्यासाठी कोणी हस्तकला करत होते, जर्नलिंग करत होते, गोष्टी बनवत होते. कागदाची मागणी वाढली. रितूला एक नवीन कल्पना सापडली. जर पेपरडम फक्त कागदाचा पुरवठादार नसून त्यापासून बनवलेल्या सुंदर गोष्टींचे निर्माते असतो तर? या क्षमतेची जाणीव झाल्यावर रितूने कागद विकण्यापासून डायरी, प्लॅनर आणि ग्रीटिंग कार्ड यांसारखी तयार उत्पादने तयार करण्याकडे आपला मोर्चा वळवला. २०२१ पर्यंत, पेपरडमने १५० ते १५०० रुपयांच्या दरम्यान ७० हून अधिक उत्पादने बाजारात आणली. यामध्ये नोटबुक, प्लॅनर, ऑर्गनायझर, स्केचबुक, लाकूड-मुक्त पेन्सिल, मेमो पॅड, ड्रॉइंग बुक आणि गिफ्ट हॅम्पर्स यांचा समावेश आहे. मेमो पॅडची किंमत १६० रुपयांपासून सुरू होते आणि डेली प्लॅनरची किंमत १,६०० रुपयांपर्यंत जाते, तर हॅम्पर्सची किंमत २,८०० रुपये असते. त्यानंतर वेबसाइट, इंस्टाग्राम आणि अमला अर्थ, ब्राउन लिव्हिंग आणि अमेझॉनसारख्या बाजारपेठांद्वारे ग्राहकांना आणि कॉर्पोरेट्सना थेट विक्री करू लागली. पेपरडम दरमहा १२ ते १३ टन कचऱ्याचा पुनर्वापर करते. जे दरवर्षी सुमारे १४० टन असते. सर्व लेखन कागदपत्रे कापडाच्या कचऱ्यापासून बनवली जातात, कारण ती मऊ असते. २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून, रितूने २०१२ मध्ये तिचे पहिले युनिट स्थापन केले. या निधीचा वापर जागा, अंतर्गत सजावट, यंत्रसामग्री, कच्चा माल आणि खेळत्या भांडवलासाठी केला गेला. १० ते १२ कर्मचाऱ्यांपासून सुरुवात करून, पेपरडममध्ये आता १५ कर्मचारी आहेत. कंपनीचे मुख्यालय गुजरातचे कापड शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरत येथे आहे. कंपनी विजिता इकोव्हेशन्स एलएलपी या नोंदणीकृत नावाने कार्यरत आहे आणि सध्या तिचे मूल्य २० कोटी रुपये आहे.
२०२३ मध्ये, वयाच्या ३७ व्या वर्षी, रितूला दुसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. उपचारांनी तिच्या मर्यादा शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे ओलांडल्या. या एकाकीपणावर मात करण्याचा तिने दृढनिश्चय केला. आता ती बरी होण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणप्रेमी, दृढनिश्चयी, अभ्यासू, दीर्घोद्योगी अशी अनेक विशेषणे रितूसाठी योग्य आहेत. लेडी बॉस हे विशेषणदेखील समर्पक आहे.