Tuesday, December 23, 2025

घेतला वसा टाकू नये

घेतला वसा टाकू नये
पूजा काळे, मोरपीस

असामी-काळजीवाहक सरकार, मत पूछो मेरा कारोबार क्या है, मोहब्बत की छोटी सी दुकान है इस बाजार में... अंगातलं सारं बळ एकवटून मदत करण्याची ताकद असलेला तो किंवा ती म्हणजे, सामान्यातली असामान्य माणसं होत. सर्वसामान्यांच्या डोक्यावर भक्कम आधाराचा हात असणं ही त्यांची खूण, जी जगायला उद्युक्त करते. आपला हात जगन्नाथ असणारी मोजकीचं माणसं वेळेवर मदतीला येतात. वाईट घटनेत, दु:खद प्रसंगी तुमच्याबरोबर खंबीर उभ्या असलेल्या माणसांना विसरायचं नसतं, हा नियम मागील पिढी पाळत आलीय; आपणही त्यांचं अनुकरण करून सदैव साथ देणाऱ्या खंबीर मनाच्या माणसांचा आदर्श धरायला हवा. मन, हृदय हे प्रत्येकात असलं तरी त्यात वसलेला चांगुलपणा हा फक्त आणि फक्त मोठ्या मनाच्या लोकांकडे पाहायला मिळतो. अंतकरणात सामावलेला ईश्वर आपल्या जवळ येतो, तो केवळ इच्छापूर्तीने आणि योगायोगाने. चांगुलपणाची किर्ती पसरायला वेळ लागत नाही. चांगल्या गोष्टीचं गुणगान करताना दाद देणं, वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करणं आणि अधिक चांगला मार्ग शोधून उत्कृष्ट कार्यक्षमता निर्माण करणं हे या प्रकारातल्या निस्वार्थी लोकांना जमतं. आणीबाणी प्रसंग, अटीतटीची वेळ, अतिव दुःखाचे डोंगर पार करण्यासाठी तत्पर असणाऱ्या व्यक्ती आपल्यासाठी उत्तुंग आणि प्रतिभावान ठरतात ते या साठीचं.

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, या म्हणीचा मूळ उद्देश लक्षात घेता, एखाद्याकडून कोणत्याही प्रकारची मदत घेताना त्याची त्या मागची किमान भावना लक्षात घेणं गरजेचं ठरतं; नाही तर नुसतचं घेत रहाणाऱ्यांची संख्या इथं कमी नाही. बोट पकडताना हात ओढून घेण्याची मानवाची कूपमंडूक वृत्ती मदत करणाऱ्याला, त्याच्या मदतीला अडथळा आणू शकते. मदत याचा अर्थ वेळेनुरूप करण्यात आलेली ऐच्छिक कृती. सत्याची वस्तुस्थिती जाणून, इच्छेने समस्येचे निराकरण करणं, त्यातून उत्कृष्ट कार्यक्षमता साधणं, या हाताने केलेलं कार्य त्या हाताला न कळणं, भावना आणि कल्पनांच्या आहारी न जाता कृतीशीलतेने वस्तुस्थितीला आकार देण्याच्या प्रयत्नात स्वतःकडून सर्वस्वी सहकार्य देऊन वास्तवाशी एकरूप होणं या कामाला मदत ही उपाधी देता येईल. अशी माणसं कर्तव्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य आणि कर्मफळाची अपेक्षा न बाळगण्याची इच्छा त्यांच्याजवळ असते. आपल्या असण्याने समोरच्या दुःखी, कष्टीताला येणारं लाखोंच बळ कर्तव्यपूर्तीचे समाधान घेऊन ही कर्तव्यदक्ष माणसं वावरत असतात. ही माणसं आपल्या अवतीभवती असतात म्हणून आपण मोकळा श्वास घेऊ शकतो.

आपली सगळी मदार यांच्या खांद्यावर पेललेली असते. तेव्हा त्यांना विसरणं अशक्यप्राय होय. ज्यांची आयुष्यात कसुभर का होईना मदत झाली असेल त्याची जाणिव मनात जपायला हवी. आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रिणी, ओळखीचे कोणीही असो त्याच्या प्रति जाणीव असायला हवी. अशी माणसं देव माणसासारखी असतात; नव्हे ती आपल्यासाठी देव माणसचं असतात. जिथं नाही कुणी तिथं देव उभा मनी. देव पांडुरंग माणसाच्या रूपाने भक्ताच्या हाकेला धावतो. गोऱ्या कुंभाराच्या मातीत सत्व ओतणारा, सावत्या माळ्याच्या उभ्या शेतात मळा फुलवणारा सखा पांडुरंग तन-मन-धनाने भक्ताला पावतो. तसाचं शंभरातला एखादा माणूस, त्या माणसातला देव संकटात मदतीला उभा ठाकतो. परीस्थितीतीला तारण्याचं बळ देतो. हाताच्या दोन्ही बाहूंची ताकद, सर्वस्व पणाला लावत, उभं करतो आपणास. परिस्थिती मानवाला शिकवते पण परिस्थितीचा फायदा घेऊ नये असे म्हणताना मदतीच्या वेळी धावणाऱ्या लोकांप्रति आदर सद्भावना ठेवणं, त्यांच्या अमूल्य वेळेचा, सामाजिक जाणीवेचा कृतकृत्य भाव आपल्यात जागृत ठेवणं या प्राथमिक तत्त्वांच मूल्य जाणणं, त्यांच्यातल्या समर्पणाचं भान राखणं, एवढं जरी आपण केलं तरी, त्यांच्या चिन्मय सद्भावना सदैव आपल्या पाठीशी राहतील. श्रम आणि मदतीचा आनंद देणारी अशी माणसं आपल्या आसपास असताना त्यांच्याप्रति निष्ठा बाणायला हवी. सत्कारणी लागणारी मदत एखाद्यास करावी, पण मदत करणाऱ्या दानशूरांना मात्र विसरू नये. या परंपरेत ऊतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये ची शिकवण सार्थ ठरेल. आपलं मनोधैर्य खचू न देणाऱ्या, आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपणास शिडीसारख्या उपयोगी ठरणाऱ्या माणसांच्या चांगुलपणाचा विजय असो. तो आपल्या अंतःकरणात साजरा होओ. परतीच्या अपेक्षेने न केलेले, जीवनअंशाचे खरे कर्म तसचं दानधर्माच्या सत्कृत्याने संचयातील धन कधीचं आटत नाही. मान, दान आणि ज्ञान या गोष्टीसह कृपावंत मदत ओंजळीत भरून घेताना, भरून सांडलेले मातीत मिसळण्यापूर्वीचं हे दानकरी हात सांभाळायला हवेत. दान देण्यासाठी पसरलेले कृपावंत हात या जगाची नाव हाकतात हे तंतोतंत खरयं, तेव्हा आपल्यासारख्या तमाम गरजूंना उपयोगी ठरणाऱ्या महान व्यक्तिंविषयी आदर बाळगणं आणि तो व्यक्त करणं नेहमीच उचित आहे.

Comments
Add Comment