अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
रविवारी (२१ डिसेंबर) रात्री दिल्लीतील एम्समध्ये उपचारादरम्यान या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला . अहाना ही अमरोहा शहरातील मोहल्ला अफगाण येथील रहिवासी. अहानाच्या कुटुंबात आई-वडील आणि एक बहीण, भाऊ देखील आहेत. अहाना ही भावंडांमध्ये सर्वात लहान होती. ती शहरातील हाश्मी गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये अकराव्या वर्गात शिकत होती. कुटुंबातील सदस्यांच्या मते, अहानाला फास्ट फूड ची खूप आवड होती. तिला बऱ्याचदा यासाठी मनाई करण्यात आली. समजावण्यात आलं, तरी ती चाउमीन, मॅगी, पिझ्झा आणि बर्गर सारखे फास्ट फूड पदार्थ सतत खात राहिली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अहानाची तब्येत बिघडली.
३० नोव्हेंबर रोजी तिला पोटात तीव्र वेदना होत होऊ लागल्या म्हणून मुरादाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलं की, तिच्या आतड्या एकमेकांना चिटकल्या आहेत आणि त्यात छिद्रही झाले आहेत. फास्ट फूडच्या सेवनामुळे आतड्यांचे नुकसान झाल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
त्यानंतर ३ डिसेंबरला अहानावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. दहा दिवसांनंतर, अहानाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, अहानाची ही दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. चार दिवसांपूर्वी तिची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर तिच्या कुटुंबाने तिला दिल्लीतील एम्समध्ये दाखल केले. कुटुंबातील सदस्यांच्या मते, अहानाची प्रकृती थोडी सुधारली होती आणि ती चालायलाही लागली होती. पण, रविवारी रात्री तिची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचं हृदय बंद पडलं. आहानाचे मामा गुलजार खान उर्फ गुड्डू यांनी सांगितले की, फास्ट फूडच्या सेवनामुळे आतड्यांचे नुकसान झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. अहानाच्या मृत्यूनंतर तिचं कुटुंब शोकाकूल झालं आहे






