Tuesday, December 23, 2025

विवाह पद्धतीतील वळणे

विवाह पद्धतीतील वळणे
मीनाक्षी जगदाळे । उत्तरार्ध : पुढील बुधवारी विवाह ही भारतीय संस्कृतीतील सामाजिक आणि कौटुंबिक संस्था. तथापि, गेल्या काही दशकांत, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, जागतिकीकरण आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे या व्यवस्थेमध्ये बदल घडले. पारंपरिक ठरवून केलेले लग्न यासोबतच प्रेमविवाह स्वीकारले जात आहेत. विवाह व्यवस्थेचे बदलते स्वरूप काय आहे हे या लेखात आपण पाहणार आहोत... पारंपरिक ठरवून केलेले लग्न आणि भरमसाठ खर्च (Traditional Arranged Marriage with Extravagant Spending)या स्वरूपात पालक किंवा कुटुंबातील सदस्य वधू-वर निवडतात. आपण आपल्या आजूबाजूला कायमच या पद्धतीची लग्न होताना पाहत असतो. दोन्ही कुटुंबांची सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थिती जुळवून पाहिली जाते. मुला मुलीचे शिक्षण, नौकरी, व्यवसाय तथा आवडी निवडी तपासून, जन्मपत्रिका जुळवून ही लग्न केली जातात. आजमितीला तीन चार दिवस चालणारे असे लग्न सोहळे, मोठं मोठी मंगल कार्यालये, सजावट, विविध विधी, प्रत्येक विधीचे महागडे पोशाख, फोटो, शूटिंग, जेवणाला असंख्य पदार्थ, स्वागत सभारंभ, नाच गाणी, विविध कार्यक्रम, कन्यादाणाच्या वस्तू तथा सामान, फटाके यावर अमाप खर्च करण्यात येतो. या भरमसाठ खर्चाची कारणे (मानसशास्त्रीय/सामाजिक) कारणे तपासली असता लक्षात येते की सामाजिक प्रतिष्ठा, कुटुंबाची समाजातली 'इभ्रत' आणि मोठेपण दर्शवण्यासाठी खर्च केला जातो. मुलांच्या लग्नात कोणतीही कमतरता नको, या पालकांच्या हट्टापोटी खर्च होतो. अजून ऐक महत्वाची बाब म्हणजे आपल्या मुलीला सासरी नंतर कोणता त्रास नको, तिला कोणी काही बोलायला नको हाही वधू पक्षांकडील हेतू असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओद्वारे इतरांना आपले वैयक्तिक यश दाखवण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे प्रदर्शनाची गरज वाढली आहे. सगळेजण आजकाल अशीच लग्न करत आहेत आणि आपल्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात राहायचे असेल तर मागे राहून चालणार नाही ही मनोवृत्ती पालकांची सुद्धा होत आहे. त्याच प्रमाणे इतर नातेवाईक, ओळखीचे आणि मित्रपरिवारा पेक्षा आपले लग्न अधिक भव्य असावे, या स्पर्धात्मक, हेवा, चुरस, तुलना या भावनेतून खर्च वाढतो. पळून जाऊन किंवा नोंदणी पद्धतीने प्रेम विवाह (Elopement/Court Marriage - Love Marriage) याचे स्वरूप पाहिले असता, कुटुंबाच्या तीव्र विरोधामुळे किंवा संमती नसल्यामुळे वधू-वर पळून जातात आणि मंदिरात, विवाह नोंदणी संस्थेत किंवा न्यायालयात विवाह करतात. या मागील मानसशास्त्रीय/सामाजिक कारणे मुख्यत्वे करून जात, धर्म, आर्थिक स्थिती किंवा सामाजिक प्रतिष्ठेमुळे कुटुंबाचा तीव्र विरोध असणे हा असतो. कोर्ट मॅरेज/रजिस्टर मॅरेजची कायदेशीर प्रक्रिया सोपी झाल्यामुळे सुलभरित्या लग्न करता येते. मोठ्या समारंभावरचा खर्च टाळून कमी वेळात लग्न करण्यासाठी तसेच तरुण पिढीला त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय स्वतः घ्यायचा असल्यामुळे हे प्रकार वाढले आहेत. मुला मुलींना आजकाल शिक्षणाच्या अथवा नौकरी च्या निम्मिताने बाहेरगावी राहण्याचे प्रमाण वाढले आहे. अश्या ठिकाणी शक्यतो कोणाचा धाक, भीती, दडपण नसते आणि मुलं मुलींना जवळ यायला पोषक वातावरण असते. अनेकदा मुला मुलींच्या घरातील वातावरण सुरक्षित अथवा चार चौघासारखे नसले, मुलांनी लहानपणापासून संघर्ष केलेला असणे, आई वडिलांशी संवाद हवा तितका मोकळा झालेला नसणे किंवा मुलांना खूप बंधनात ठेवलेले असणे, योग्य मार्गदर्शन न मिळणे, चित्रपट, सामाजिक माध्यमातून मिळणारी माहिती, कुटुंबातील लोकांबद्दल फारस प्रेम आपुलकी जवळीक नसने, घरातील संस्कार, संस्कृती चा होत चाललेला ऱ्हास ही कारणे पण तरुण पिढीला पळून जावून लग्न करायला भाग पाडतात. लव्ह-कम-अरेंज मॅरेज(Love-cum-Arranged Marriage with Family Consent)याचे स्वरूप वधू-वर एकमेकांना पसंत करतात, काही दिवस रिलेशन शिप मध्ये राहतात पण नंतर कुटुंबाला विश्वासात घेऊन, त्यांची संमती मिळवून, दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत विवाह करतात. अनेकदा 'नोंदणी पद्धत' (Court Marriage) किंवा लहानसा स्वागत समारंभ आयोजित केला जातो. ही विवाह पद्धती मुलांना आवडीचा जोडीदार पण मिळवून देते आणि दोघांचे पालक, सर्व कुटुंब, नातेवाईक पण समाधानी होतात. या लग्नाचे मानसशास्त्रीय/सामाजिक कारणे पाहिली असता, प्रेम विवाह करताना जो कुटुंबाचा भावनिक पाठिंबा हवा असतो, यामुळे आधुनिक आणि पारंपारिकतेचा समन्वय साधला जातो. समाजाकडून आणि नातेवाईकांकडून विरोधाची शक्यता कमी होते. कुटुंबाचा आशीर्वाद मिळाल्याने वैवाहिक आयुष्याला भावनिक सुरक्षित आधार मिळतो. कोणालाही वधू वरांना अथवा त्यांच्या घरच्यांना वावगे बोलण्याची, नावं ठेवण्याची, अथवा बदनामी करण्याची संधी मिळत नाही. अश्या विवाहात भविष्यात काही समस्या उद्भवल्यास पालक, नातेवाईक मध्यस्थी करून त्यावर उपाययोजना करू शकतात. तसेच पती पत्नी वर देखील लग्न टिकवण्याची जबाबदारी असल्याने एकमेकांना सांभाळून घेण्याकडे कल असतो. रजिस्टर लग्न/प्रेम विवाह करून नातेवाईकांपासून लपवणे (Secret Registered Marriage/Love Marriage)याचे स्वरूप खूपच वेगळे आणि विचित्र असते. वधू-वर कोर्टात नोंदणी पद्धतीने लग्न करतात, पण कुटुंबातील काही सदस्यांना किंवा नातेवाईकांना काही काळ ही गोष्ट कळू देत नाहीत. अगदीच जवळच्या लोकांना विश्वासात घेवून मित्र मंडळी न घेवून हे लग्न उरकले जाते. या लग्नाची कोणतीही प्रसिद्धी, फोटो, विडिओ सुद्धा सार्वजनिक केले जातं नाहीत. असे लग्न करतांना खूप गोपनीयता पाळली जाते. अत्यंत गुपचूप दोन्ही कडील महत्वाचे लोकं एकमेकांना भेटणे, घर दार पाहणे, लग्नाची बोलणी करणे इतर कोणालाच विचारात न घेता उरकून घेतात. या मागील मानसशास्त्रीय/सामाजिक कारणे अभ्यासले असता लक्षात येते की, त्वरित विरोध किंवा संघर्ष टाळण्यासाठी 'वेळ विकत घेणे' हा यामागील उद्देश असतो. काही नातेवाईक ज्यांनी आपले मन दुखावले आहे, ज्यांच्याशी कौटुंबिक वाद विवाद आहेत, पूर्वी पासून भांडण आहेत, ज्यांना परकं किंवा लांबच मानलं जात त्यांना अश्या लग्नाला अजिबात बोलावलं जात नाही अथवा सांगितले जातं नाही. आपलेच नातेवाईक आपल्या लग्नात विघ्न आणतील, आपल्या लग्नाला वेगळे स्वरूप दिले जाईल या भीतीने त्या नातेवाईकांना शक्य झालेच आणि इच्छा असलीच तर नंतर सांगण्याचा निर्णय घेतला जातो. अनेकदा ज्या कुटुंबातील लोकांनी, नातेवाईक यांनी भूतकाळात आपल्या पासून पण काही गोष्टी लपवल्या होत्या याची आठवण ठेवून हेतूपुरसर त्यांना मुद्दाम अपमानित करण्यासाठी, बदल्याच्या भावनेतून सुद्धा असे केले जाते. लग्नानंतर लगेच समारंभ करणे शक्य नसल्यास, मुलगा मुलगी व्यवस्थित सेटल नसल्यास किंवा स्वतःचे घर अथवा आर्थिक स्थिरता नसताना, किंवा कोणतेही अपरिहार्य कारण असल्यास अश्या पद्धतीने लग्न केले जाते. आधी लग्न करून नंतर हळूच जाहीर करावे आणि त्यावेळी काहीतरी खोटे कारण अथवा पार्शवभूमी तयार करावी असे ही प्रकार यामागे असतात. आता वरील सर्व प्रकारच्या लग्नाचे फायदे आणि तोटे पाहिले असल्यास जाणवते की,पारंपरिक ठरवून केलेले लग्न असल्यास कौटुंबिक पाठिंबा मिळतो, दोन कुटुंबांतील जुळलेले सामाजिक-आर्थिक संबंध टिकून राहतात, भावनिक आधार मिळतो. समाजात ताठ मानेने वावरता येते. या लग्नाच्या कमकुवत बाजू पण खूप आहेत. अनेकदा प्रेम दुसऱ्यावर असते पण सामाजिक दडपण, कौटुंबिक बंधन आणि मर्यादा यामुळे मुलं मुली ठरवून केलेल्या लग्नाला होकार देतांना दिसतात. या लग्नात वधू-वरांना एकमेकांना समजून घेण्यास कमी वेळ मिळतो, एकमेकांशी जुळवून घेण्याचा दबाव असतो, काही बिनसलं तरी ते कस आणि कोणाला सांगायचं ही भीती असते, ठरवून केलेल्या लग्नाचे पण अनेकदा घटस्फोट होतात अथवा आत्महत्या, हुंडाबळी अशी प्रकरणे होतात. ठरवून केलेल्या लग्नात अनावश्यक खर्च, मान पान, हुंडा यातून अनेकदा वाद निर्माण होतो. अनेकदा केवळ नातेवाईकांनी एकमेकांना शब्द दिलेला असतो म्हणून नात्यातील मुला मुलींची लग्न लावली जातात पण या ठिकाणी त्यांची आवड निवड निर्णय लक्षात घेतला जात नाही.
Comments
Add Comment