Wednesday, December 24, 2025

ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका

ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजकीय राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत मागील मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या समर्थकांची सत्ता आहे. या सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष आकंठ भ्रष्टाचारात बुडाला असल्याचे मंत्री आशिष शेलार म्हणाले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करताच भाजपने दोन्ही भावांना जबर राजकीय धक्का दिला आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा ठाकरे बंधूंसाठी मोठा दणका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उल्हासनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा दणका बसला. उल्हासनगरचे माजी उपमहापौर व माजी सभागृह नेते धनंजय बोडारे, माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे, शितलताई बोडारे, ओमी कलानी गटाचे माजी नगरसेवक नाना बिराडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार कुमार आयलानी, उल्हासनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप राजानी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणइ कार्यकर्ते उपस्थित होते.

पनवेलमध्ये मनसेला मोठा धक्का बसला. मनसेचे पनवेल महानगर संघटक तानाजी पिसे, नवीन पनवेलचे शहराध्यक्ष प्रथमेश गवळी, विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष रोहन गवळी, पदाधिकारी केनेथ देवासगयम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांना पक्षात प्रवेश देताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप परिवाराच्या विकासाभिमुख आणि पारदर्शक कार्यशैलीने प्रेरित होऊन हे पदाधिकारी प्रवेश करत असल्याची माहिती दिली.

Comments
Add Comment