Wednesday, December 24, 2025

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या सुरक्षेस्तव मुंबईतील हॉटेल्स, पब्स आणि मॉल्ससाठी मुंबई महापालिका आणि अग्निशामक दल यांनी विशेष नियमावली आखल्या आहेत.

मुंबई महापालिकेने अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात कडक पाऊले उचलल्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून मुंबईतील हॉटेल्स, पब बार आणि मॉल्स ची झाडाझडती सुरु झाली असून पहिल्याच दिवशी ७३१ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ आस्थापनांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.

२८ डिसेंबर पर्यंत 'विशेष मोहीम'

काही दिवसांपूर्वी गोव्यात पब मध्ये झालेली दुर्घटना हि ताजी आहेच. अश्याच आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने २२ ते २८ डिंसेबर या कालावधीत 'विशेष अग्निसुरक्षा मोहीम' हाती घेतली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात आहे.

कुणाकुणाची होणार तपासणी?

रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बार पब, जिमखाने आणि बँक्वेट हॉल्स मॉल्स आणि सिनेमागृहे लॉजिंग-बोर्डिंग आणि पार्टी हॉल्स

मालकांवर असेल जबाबदारी (महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक कायदा)

अग्निशामक दलने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार, इमारतीमध्ये किंवा आस्थापनांमध्ये अग्नी प्रतिबंधक यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याची पूर्ण जबाबदारी मालकांची किंवा भोगवटादारांची असेल. जर यंत्रणेत त्रुटी आढळल्यास, कडक दंड किंवा आस्थापना सील करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

थर्टी फर्स्टसाठी विशेष सतर्कता

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील समुद्रकिनारे, क्लब आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता, आगीची घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे का, याची खात्री या मोहिमेद्वारे केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >