मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने आज २३ डिसेंबर २०२५ पासून नामनिर्देशन अर्ज अर्थात उमेदवारी अर्ज विक्रीस सुरूवात झाली आहे. त्यानुसार, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण ४ हजार १६५ उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. काही उमेदवारांनी प्रतयेकी दोन ते तीन अर्जांच्या प्रतींची खरेदी केली आहे. एम पश्चिम अर्थात चेंबरमधून सर्वांधिक अर्जांची विक्री झाली आहे.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या निवडणुकीकरता उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज देण्यास मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार मंगळवारी पहिल्याच दिवशी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण ४ हजार १६५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रात २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये २३ डिसेंबर ते दिनांक २९ डिसेंबर २०२५ या दरम्यान कार्यालयीन वेळेत तर, मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज उपलब्ध होतील. गुरूवार, २५ डिसेंबर २०२५ आणि रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्जाच्या प्रती दिल्या जाणार नाहीत.
नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या दरम्यान दररोज सकाळी ११ ते दुपारी ५ पर्यंत आहे. गुरूवार, २५ डिसेंबर २०२५ आणि रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आवश्यक प्रशासकीय यंत्रणा, कर्मचारी तसेच तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून केली जाणार आहे. तर, छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी त्वरीत प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक दिनांक २ जानेवारी २०२६ सकाळी ११ ते दुपारी ३ असा आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया व निकाल जाहीर करण्यात येईल.
नामनिर्देशन पत्रांची छाननी, वैधता तपासणी, उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्याचे सर्व टप्पे निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमानुसार राबविण्यात येणार आहेत. उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी नामनिर्देशन प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
याशिवाय, नामनिर्देशन पत्रे दाखल करताना उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे तसेच अनिवार्य शुल्क वेळेत सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असून, कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधित नामनिर्देशन बाद होऊ शकते, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी, असे महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे.
प्रशासकीय विभाग आणि वितरण केलेले उमेदवारी अर्जांच्या प्रतींची संख्या
- एच पूर्व अधिक के पूर्व विभाग - १०२
- एच पूर्व अधिक एच पश्चिम विभाग -२६३
- के पूर्व अधिक के उत्तर विभााग-२४०