छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यात यांचा एकही नेता फिरला नाही, मात्र मुंबई महापालिका जवळ येताच यांना मुंबईचा पुळका आला आहे. खरं तर, मुंबई महानगरपालिका ही त्यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि म्हणूनच दरवेळी भावनिक प्रचार करून मुंबईकरांची दिशाभूल केली जाते," अशा जळजळीत शब्दांत मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शिवसेना (UBT) वर निशाणा साधला.
मुंबईत महायुतीचाच झेंडा फडकणार
मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा निर्धार व्यक्त करताना शिरसाट म्हणाले की, "आम्हाला मुंबईत महायुतीचा विजयाचा झेंडा फडकवायचा आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज-उद्या अंतिम बैठक होईल. आमची एकत्र लढण्याची मानसिकता पक्की आहे."
मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला ...
संभाजीनगरमधील युतीचा पेच : "काहींना युती नकोय"
संभाजीनगरमधील भाजप-शिवसेना युतीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "शिंदे साहेबांनी महायुती करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत, मात्र स्थानिक पातळीवर काही लोकांना युती व्हावी असे वाटत नाही. आतापर्यंत चार बैठका झाल्या, पण काहींनी अवास्तव जागांची मागणी केल्याने एकमत होऊ शकले नाही. आम्हाला भांडण उकरून काढायचे नाही, म्हणून आम्ही शांत आहोत. लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अन्यथा वरिष्ठ यात हस्तक्षेप करतील."
ठाकरे बंधूंच्या युतीवर आणि 'सामना'वर टीका
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर भाष्य करताना शिरसाट म्हणाले, "राज ठाकरे हे आग्रही आणि हट्टी आहेत. जोपर्यंत जागावाटपाचा आकडा ठरत नाही, तोपर्यंत ही युती कागदावरच राहील. दुसरीकडे, 'सामना'तून कितीही बोंबा मारल्या तरी जनतेने आम्हाला कौल दिला आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका आम्ही जिंकल्या आहेत. शिंदे साहेबांचे नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस जात नाही, पण यांना आता कधीही यश मिळणार नाही."
खैरे 'मामू' आणि अंबादास दानवेंवर निशाणा
चंद्रकांत खैरे यांच्या विधानावर बोलताना शिरसाट म्हणाले, "ज्या हिंदुत्वावर शिवसेना उभी राहिली, त्याच पक्षात आता 'मामू' होण्याचे प्रकार सुरू आहेत. काही लोक पक्षाकडे धंदा म्हणून पाहतात, पैसे घेऊन तिकीटं वाटली गेली. अंबादास दानवेंनी MIM ची मते घेताना विचार केला नाही का? आता त्यांच्यावर गोडरेजचं कुलूप लावण्याची वेळ आली आहे."
"उद्धव ठाकरेंचा डबा रुळावरून घसरला"
सांस्कृतिक मैदानावरील सभेच्या वादावर बोलताना शिरसाट यांनी टोला लगावला, "गल्लीत सभा घेण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. काय करायचं हे आम्हाला चांगलं कळतं, म्हणूनच आमचा पक्ष पुढे चालला आहे आणि तुमचा डबा रुळावरून घसरला आहे. उद्धव ठाकरेंनी आता काठावर बसण्याची तयारी ठेवावी."






